Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना पुन्हा एकदा एका मानाच्या पुरस्कारने गौरवण्यात आलं आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar Award 2024) प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्काराने अशोक सराफ यांचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. अमिताभ बच्चन, संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सोहळ्यानंतर अमिताभ यांच्यासमोर अशोकमामांनी भावनिक भाषण केलं. 


मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 वा पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा दीनानाथ नाट्यगृह येथे पार पडला. गेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आत्तापर्यंत सुमारे 212 व्यक्तींना गेल्या 34 वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. 


माझ्यासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट - अशोक सराफ


मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कारानंतर अशोक सराफ यांनी म्हटलं की, इतक्या आनंदाने आणि प्रेमाने तुम्ही इथे आलात त्याबद्दल आभार. अनेक थोर मंडळी आज इथे बसली आहेत,त्यांच्या रांगेत मी बसलोय हाच माझा एक मोठा सन्मान आहे. अनेक पुरस्कार मिळालेत इतके की आता ते आठवतंही नाही आणि मोजताही येत नाही. पण आजचा पुरस्कार फारच महत्त्वाचा आहे. ही आनंदाची परिसीमा झालीये, असं मला वाटतं. मी एक कलाकार. एका असमान्य गायक कलाकाराच्या नावाने मिळालेला मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावानं मिळालेला हा पुरस्कार, एका असामान्य कुटुंबाकडून मिळतो आणि एका असामान्य नटाच्या समोर मिळतोय, ही सगळ्यात मोठी आणि कायम लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे माझ्यासाठी. 


हा सन्मान तुम्हा सगळ्यांचा - अशोक सराफ


पुढे त्यांनी म्हटलं की,  हा सन्मान जरी वरवर वाटत असलं की माझा आहे, पण तो माझा नाही तो तुम्हा सगळ्या लोकांचा सन्मान आहे. कलाकार त्याच्या परीने करत असतो. वेगवेगळे प्रयोग करतो, पण हे जर तुम्हाला नाही आवडले किंवा नाही पटले तर त्याचा काहीही उपयोग नाही. पण मी जे करत गेलो ते तुम्हाला आवडत गेलं, त्याबद्दल तुम्ही तुमच्या भावना दरवेळी व्यक्त केल्यात, त्यासाठी मी आपला मनोमन ऋणी आहे. हे माझ्या आयुष्यात काम लक्षात राहिल मी हे कधीही विसरु शकणार नाही. आज मी माननीय हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार मानतो की त्यांनी मला या पुरस्काराच्या लायक समजलं. माझी इतक्या वर्षांची जी काही तोडकी मोडकी सेवा असेल, ती त्यांनी समजून घेतली त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि मी हे कधीही विसरु शकणार नाही. 


ही बातमी वाचा : 


Amitabh Bachchan : मंगेशकर पुरस्कारांचं मागील वर्षीच अमिताभ यांना होतं आमंत्रण, पण खोटं कारण सांगून जाणं टाळलं; यंदाच्या सोहळ्यात स्वत:च सांगितला किस्सा