Amitabh Bachchan : मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दीनानाथ नाट्यगृहात हा कार्यक्रम सोहळा पार पडला.  मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आत्तापर्यंत सुमारे 212 व्यक्तींना गेल्या 34 वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (Lata Dinanath Mangeshkar Award 2024) या वर्षी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना प्रदान करण्यात आला आहे. 


या पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी भाषणादरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एका भाषणावेळीचा किस्सा सांगितला. त्याचप्रमाणे मी मराठी शिकत आहे, पण मला अजून जमलं नाही, अशी मिश्किल टीप्पणी यावेळी अमिताभ बच्चन यांनी केली आहे. तसेच अमिताभ यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण त्यांनी त्यावेळी जाणं का टाळलं याबद्दल त्यांनी यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात भाष्य केलं आहे. 


यंदा माझ्याकडे कोणतंच कारण नव्हतं - अमिताभ बच्चन 


अमिताभ यांना मागील वर्षी देखील या सोहळ्याचं आमंत्रण होतं, पण त्यांनी का टाळलं याविषयी त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की,  माझ्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कारण मी स्वत:ला अजून तितकं मोठं नाही समजत की मला असे पुरस्कार मिळावेत. हृदयनाथजींचे विशेष आभार, त्यांनी मला आमंत्रित केलं. मागील वर्षीही त्यांनी मला बोलावलं होतं. पण मी तेव्हा सांगितलं मला बरं वाटत नाहीये, म्हणून मी नाही येऊ शकत. खरंतर मी बरा होतो पण मला यायचं नव्हतं. पण यावर्षी माझ्याकडे कोणतं कारण नव्हतं त्यामुळे यावं लागलं, असा मजेशीर किस्सा अमिताभ यांनी सांगितला आहे. 


प्रेक्षकांमधून मला ती हाक आली... - अमिताभ बच्चन


लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानंतर अमिताभ बच्चन म्हणाले की, असाच एका कार्यक्रमात गेलो होतो तेव्हा प्रेक्षकांमधून मला हाक आली ए मराठी... मराठी. तेव्हा मी हात जोडून त्यांची माफी मागितली की, मराठी शिकत आहे आणि मी वाचलो. या गोष्टीला आता 10 ते 12 वर्ष झालीयेत आणि अजूनही मी मराठी नाही शिकलोय. आधी समजायचं नाही, पण आता थोडं समजतं. त्यामुळे मी आता प्रयत्नशील आहे, की थोडं मराठी शिकेन. 




ही बातमी वाचा : 


Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार; ए. आर. रहमान, अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे यांचाही खास सन्मान