मुंबई : राज्यात आठवड्याभरापासून अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. आजही राज्यात पावसाची शक्यता आहे, तर मुंबई, ठाणेसह कोकणात तापमानात वाढ होणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने, पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळीवारा, गारपीट यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट
हवामान विभागाने कोकणात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढील 24 तासाता उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. याउलट, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्याच्या या भागात अवकाळी पावसाची हजेरी
मागील आठवड्यापासून विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये सलग दोन-तीन दिवस पावसाची रिमझिम सुरु आहे. आयएमडीकडून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड परभणी, हिंगोली या भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. त्यासोबतच पुणे, अहमदनगर, जालना, जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे.
देशातील इतर भागात हवामान कसं आहे?
देशातील काही राज्यांमध्ये कडक उन्हाळा सुरू झाला आहे, तर उत्तर भारतातील काही भागात पावसामुळे वातावरणात थंडावा पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पंजाब आणि हरियाणामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांडमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :