Ashok Saraf : महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोकमामा अर्थातच अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते अशोक सराफ यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. संगीत नाटक अकादमीतर्फे नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येतो. अशोक सराफ यांचा पुरस्कार स्विकारतानाचा एक व्हिडिओ निवेदिता जोशी सराफ (Nivedita Saraf) यांनी शेअर केलाय.
निवेदिता यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन हा व्हिडिओ शेअर केलाय. खूप खूप अभिमान वाटला अशोकला हा पुरस्कार स्वीकारताना पाहून. आम्ही दोघाही महाराष्ट्राच्या जनतेचे ऋणी आहोत, असं कॅप्शन निवेदिता सराफ यांनी या व्हिडिओला दिलं आहे. निवेदिता सराफ यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत लाडक्या अशोकमामांचं अभिनंदन केलं आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी देशातील कलाकार आपली भारतीय कला आणखी समृद्ध करत राहतील असा विश्वास व्यक्त केला.
अशोक सराफांसह या कलाकारांचा सन्मान
अशोक सराफ यांच्यासह देवकी पंडित, अशोक सराफ, विजय चव्हाण यांचा देखील सन्मान करण्यात आला आहे.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी
- अशोक सराफ, अभिनय
- विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक
- कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत
- नंदिनी परब गुजर, सुगम संगीत
- सिद्धी उपाध्ये, अभिनय
- महेश सातारकर, लोकनृत्य
- प्रमिला सूर्यवंशी, लावणी
- अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
- सारंग कुलकर्णी, सरोद वादक
- नागेश आडगावकर, अभंग संगीत
- ऋतुजा बागवे, अभिनय
- प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला
अशोक सराफांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार गौरव
जेष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या हस्ते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले.
अशोक सराफांच्या कारकिर्दीचा प्रवास
दादा कोंडकेंसोबत पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे अभिनयाचे विविध पैलू त्यांनी उलगडले. 'वजीर'सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा त्यांनी निभावली. ऐंशीच्या दशकात लक्ष्यामामा आणि अशोकमामा या जोडीने महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि कलेच्या माध्यमातून त्यांच्या मनोजरंजनाची सेवा देखील केली. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, एक गाडी बाकी अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन नाही केलं तर मराठी चित्रपटाचा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.