मुंबई : आशा भोसले हे नाव जगभरात विविध देशांत राहणाऱ्या कोणाही संगीतप्रेमीला नवं नाही. आशा भोसले यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गाण्याला सुरूवात केली. आणि बघता बघता आशा भोसले हे नाव सर्वमुखी झालं. आज त्या 88 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. जगभरातल्या त्यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आशाताईंनीही त्याचा स्वीकार ट्विटरवरून केला आहे.


आशा भोसले यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सगळ्यांना साकारात्मक राहण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय, मी आता 87 मधून 88 व्या वर्षात पदार्पण करते आहे खरं पण आत्ता मी माझ्या चाळीशीतच असल्यासारखं मला वाटतं असं त्या म्हणतात. सर्वांनी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिने पाहा असा सल्ला देतानाच शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनोमन आभार मानले आहेत.





आशा भोसले गेल्या जवळपास 70 वर्षापासून गात आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, तामीळ, तेलुगु आदी भाषांत गाणी गायली आहेत. आज त्यांच्या वाढदिनी संगीतकार ए.आर. रेहमानपासून अनेक दिग्गजांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लता मंगेशकर यांनीही ट्विटकरून आपल्या शुभेच्छा दिल्या.


आशा भोसले यांच्या सिनेसंगीत क्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊन सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. शिवाय त्यांना पद्मविभूषण देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. ओ.पी.नय्यर, खय्याम, नौशाद, आर.डी.बर्मन, रवींद्र जैन, ए.आर.रेहमान, एलया राजा, शंकर जयकिशन आदी अनेक संगीतकारांसबोत त्यांनी काम केलं. मराठीत सुधीर फडके, श्रीनिवास खळे, सलील कुलकर्णी आदी अनेक संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या वाढदिनी युवा वर्गातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. या सर्वाचे आशा भोसले यांनी आभार मानले आहेत.