मुंबई : माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते असं वक्तव्य, मग पाकव्याप्त काश्मीरसोबत मुंबईची तुलना यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबतची शाब्दिक चकमक, यानंतर अभिनेत्री कंगना रनौतला केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह सरकारमधील अनेक नेत्यांनी आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करणाऱ्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा मिळणं हे दु:खद असल्याचं मत या नेत्यांनी व्यक्त केलं.


केंद्रीय गृहमंत्रालयाने अभिनेत्री कंगना रनौतला वाय दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर कंगना रनौतला सीआरपीएफचे कमांडोचं सुरक्षा कवच असेल. सीआरपीएफची सुरक्षा मिळवणारी कंगना ही पहिली बॉलिवूड स्टार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारताचे सरन्यायाधीश एस ए बोबडे, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह जवळपास 60 हायप्रोफाईल व्हीआयपींचं सरंक्षण देशाचं सर्वात मोठं निमलष्करी दल सीआरपीएफ करत आहे.


भारतात व्हीआयपींना पाच श्रेणींमध्ये सुरक्षा दिली जाते, जी केंद्रीय गृहमंत्रालय देते. विविध श्रेणींनुसार या सुरक्षांमध्ये जवानांची संख्या निश्चित केली जाते. जाणून घेऊया एक्स, वाय, झेड, झेड प्लस, एसपीजी सुरक्षा काय असते? कोणत्या श्रेणीत कोणाला आणि कोणत्या परिस्थितीत सुरक्षा मिळते याचाही आढावा घेऊया.


गृहमंत्रालयकडून सुरक्षेचा आढावा
व्हीआयपींना पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कक्षेत येतो. गृहमंत्रालय वेळोवेळी व्हीआयपींच्या सुरक्षेचा आढावा घेत असतं. यानुसार ठराविक काळानुसार सुरक्षा वाढवली किंवा कपात केली जाते. व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी देशात एसपीजीसह झेड प्लस, झेड, वाय प्लस, वाय आणि एक्स सुरक्षेची व्यवस्था आहे.


भारतात व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, राजकीय नेते, हाय-प्रोफाईल मान्यवर, दिग्गज खेळाडू यांना ही सुरक्षा दिली जाते. पोलीस आणि स्थानिक सरकारसह एनएसजी, आयटीबीपी आणि सीआरपीएफकडून दिली जाते. एनएसजी कमांडो हे व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी असतात.


देशात असा आहे व्हीआयपींच्या सुरक्षेची श्रेणी


1. SPG सुरक्षा
विशेष सुरक्षा दल म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ही देशातील उच्चस्तराची सुरक्षा फोर्स आहे, जी मर्यादित व्हीव्हीआयपींनाच पुरवली जाते. एसपीजीची सुरक्षा चार स्तराची असते. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे असते. पंतप्रधानांशिवाय माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही काही काळासाठी ही सुरक्षा मिळते.


देशाच्या माजी पंतप्रधान 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1988 मध्ये एसपीजीची स्थापना झाली होती. एसपीजीचं वार्षिक बजेट 300 कोटींपेक्षा जास्त असतं. ही देशातील सर्वात महागडी आणि कडेकोट सुरक्षा समजली जाते.


2. Z+ सुरक्षा
एसपीजीनंतर झेड प्लस ही देशातील दुसरी महत्त्वाची व्हीआयपी सुरक्षा आहे. झेड प्लसमध्ये तीन स्तराची सुरक्षा असते. यामध्ये एकूण 36 सुरक्षा कर्मचारी असतात. त्यापैकी 10 एनएसजीचे विशेष कमांडो असतात, जे प्रथम स्तराची सुरक्षा सांभाळतात. यानंतर एसपीजीचे इतर जवानांना दुसऱ्या स्तराच्या सुरक्षेची जबाबदारी असते. तिसऱ्या स्तराची जबाबदारी निमलष्करी दल जसं की आयटीबीपी, सीआरपीएफ, सीआयएसएफ इत्यादी जवानांवर असते. झेड प्लस सुरक्षा सामान्यत: अशा केंद्रीय मंत्र्यांना किंवा महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाते, ज्यांना दहशतवादी हल्ल्याचा धोका असतो.


3. Z सुरक्षा
देशात ही तिसऱ्या क्रमांकाची व्हीआयपी सुरक्षा आहे. झेड सुरक्षेत एकूण 22 जवान असतात. या श्रेणीमध्ये आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवान आणि अधिकारी सुरक्षेसाठी असतात. या श्रेणीत सुरक्षेसाठी एस्कॉर्ट आणि पायलट वाहनही दिलं जातं.


4. Y सुरक्षा
व्हीआयपी सुरक्षेत चौथ्या स्थानावर असलेली वाय दर्जाची सुरक्षा सर्वसामान्य आहे. बहुतांश व्हीआयपींना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते. यामध्ये एकूण 11 जवानांचा समावेश असतो. त्यापैकी एक किंवा दोन कमांडो, दोन पीएसओ म्हणजे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स आणि उर्वरित निमलष्करी दलाचे जवान असतात.


5. Y Plus सुरक्षा
वाय प्लस श्रेणीमध्ये एक एस्कॉर्ट वाहन आणि वैयक्तिक सुरक्षारक्षकासह निवासस्थानी एक गार्ड कमांडर आणि चार गार्ड तैनात असतात. या गार्डपैकी एक हा उपनिरीक्षक पदाचा अधिकारी असतो. तर इतर तीन सुरक्षारक्षकांकडे शस्त्र असतं.


6. X सुरक्षा
व्हीआयपींना दिली जाणारी ही सुरुवातीची सुरक्षा आहे. एक्स श्रेणीत केवळ दोन जवानांचा समावेश असतो. यापैकी एक पीएसओही असतो.