मुंबई : सुशांतसिहं राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. NCB च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने चौकशीदरम्यान ड्र्ग्स घेतल्याचं कबूल केलं आहे. सुशांत आणि त्याच्या मित्रांसोबत अनेकदा ड्रग्स घेतल्याचंही तिने मान्य केलं आहे. अटकेनंतर आता रियाची मेडिकल टेस्ट केली जाणार आहे.


पुरावे मिळाल्यानंतर रियाला अटक करण्यात आली आहे. रियाचे ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याचंही उघड झालं आहे. रिया सराईत गुन्हेगार नसल्याने तिला रिमांडची गरज नाही. मात्र वेळोवेळी तिला चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे, असं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.


रियाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाईल. एनसीबीने रियाची रविवारी सहा तास आणि सोमवारी आठ तास चौकशी केली. यावेळी एनसीबीने रिचा धाकटा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि सुशांतचा वैयक्तिक कर्मचारी दीपेश सावंत यांची समोरसमोर चौकशी केली.


विशेष म्हणजे, NCB ने मोबाइल चॅट रेकॉर्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक डेटा प्राप्त केला होता, ज्यामध्ये हे लोक बंदी घातलेल्या ड्रग्सची खरेदी करत असल्याचं समोर आलं होतं. गेल्या काही दिवसांतील या प्रकरणाच्या तपासादरम्यान एनसीबीने या तिघांना अटक केली आहे.


यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयमार्फत रियाची चौकशी करण्यात आली होती. रियाने बर्‍याच मुलाखतींमध्ये सांगितले होते की तिने स्वत: कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. सुशांतसिंग राजपूत गांजा खायचा असा दावा तिने केला होता.


मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाने कबूल केले की तिने ड्रग्स सेवन केले आहे. एनसीबीने अंजू केशवानी नावाच्या व्यक्तीलाही अटक केली. कैजन इब्राहिमच्या चौकशीदरम्यान केशवानीचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणात कैजनलाही अटक करण्यात आली होती.


एनसीबीने आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना अटक केली आहे. त्यातील सात जण या तपासाशी थेट संबंधित आहेत तर एनडीपीएस कायद्यातील कलमांतर्गत चौकशी सुरू झाल्यानंतर दोघांना अटक केली गेली. अभिनेता सुशांतसिंग राजपूत 14 जून रोजी वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता.