Anand Ingale :  'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर' या सिनेमातून अभिनेते आनंद इंगळे (Anand Ingale) हे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आनंद इंगळे यांनी आतापर्यंत अनेक नाटकं, सिनेमे, मालिका यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याचप्रमाणे ते विनोदी नट म्हणूनही प्रेक्षकांच्या तितकेच पसंतीस उतरले. कुंकू, शेजारी-शेजारी या त्यांच्या मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘माकडाच्या हाती शंम्पेन’ हे नाटक त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. त्यांच्या या पहिल्याच व्यावसायिक नाटकाने त्यांना ओळख मिळवून दिली. 


नुकतच त्यांनी सौमित्र पोटेच्या मित्रम्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. तसेच यावेळी त्यांनी इंडस्ट्रीतल्या एका विशिष्ट काळाविषयी देखील भाष्य केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवळकर यांचे देखील कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी त्या काळाविषयी त्यांचा राग देखील व्यक्त केला. तसेच सध्या नव्या आशयाचे सिनेमे घेऊन येणाऱ्या तरुण मुलांचं देखील त्यांनी कौतुक केलं आहे. 


घाणेरडी कॉमेडी करुन गलिच्छ सिनेमा करायचा - आनंद इंगळे


मराठी  सिनेमांविषयी तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना आनंद इंगळेंनी त्यांचं स्पष्ट मतही व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं की,  'होय नक्कीच मराठी सिनेमा बदलालय. अत्यंत हुशार मुलं इंडस्ट्रीत आली आहेत. आजही माझा असा दावा आहे, की जितके विषय मराठी सिनेमात येतात,ते कुठेच नाहीत. अर्थात त्याला प्रेक्षकांची साथ मिळत नाहीये, पण तरुण मुलं काय मस्त मस्त स्क्रिप्ट आणतात, लिहिततात आणि करतात सुद्धा. आज हे बोलायला हरकत नाही, पण एक विशिष्ट काळ होता, जेव्हा  फक्त कुठलेतरी दोन मित्र घ्यायचे आणि एक घाणेरडी कॉमेडी करुन गलिच्छ सिनेमा करायचा, असं होतं. मला यावेळी मुद्दाम नावं घ्यायची नाहीत,त्यामुळे त्यांच्या घरं गाड्या झाल्या त्याबद्दल मला बोलायचं नाही. पण काय झालं त्याने वाट लावली ना. वाट लावली, आधीचे दोघेजण कोणीतरी, नंतरचे दोघेजण कुणीतरी. अच्छा वच्छा करुन चाललेत, का कंटाळणार नाही लोकं. मग मला कौतुक वाटतं स्मिता तळवकर सारख्या बाईचं की इतक्या प्रचंड लाटेतही ति वेगळे सिनेमे करत राहिली.'


'ज्यांची लायकी देखील नाही त्यांनी का माझ्यावर बोलावं'


सोशल मीडिया कसा पाहता तुम्ही या प्रश्नावरही आनंद इंगळे यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'मी माझ्या सिनेमांसाठीच फक्त सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. बाकी मी माझं वैयक्तिक त्यावर काहीही मांडत नाही. ज्यांची लायकी देखील नाही त्यांनी का माझ्यावर बोलावं. मी काय केलं आहे, काय केलं नाही, यावर कुणी का बोलावं. माझ्या कामाविषयी तुम्ही नक्की बोला, अगदी 500 टक्के बोला. त्यावर काहीही प्रश्न नाही. तुला माझं काम आवडलं नाही, तर त्यावर तु नक्की बोल कारण मी ते सोशल मीडियावर टाकलंय. सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे, जी कशी वापरायची हे मला अजूनही कळलं नाहीये. पण मला भयंकर वाईट वाटतं, की आपल्याकडच्या कोणत्याही नटीच्या फोटोखाली अत्यंत घाणेरड्या कमेंट्स असतात. आपली वैयक्तिक मतं जी समोरच्याची नाहीत, तर तो नालायक आहे, असंच धरुन चालतो आपण', असंही आनंद इंगळे यांनी म्हटलं.  


ही बातमी वाचा : 


Malaika Arora : बॉलीवूडची 'मुन्नी' कोट्यवधींची मालकीण, मलायकाने तीन वर्षांसाठी पुन्हा एक घर दिलं भाड्याने; महिन्याचं घरभाडं ऐकून व्हाल थक्क