Amey Khopkar : आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी नुकतच अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) उल्लेख केल्याने एकच खळबळ माजली आहे. आमदार धस हे सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करुन त्यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अभिनेत्रींचा उल्लेख केला. त्यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं. या प्रकारानंतर मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी धस यांच्यावर निशाणा साधत त्यांना थेट इशारा दिलाय.
दरम्यान अमेय खोपकर यांनी एबीपी माझासोबत संवाद साधताना सुरेश धस यांनी प्राजक्ताची माफी मागायला हवी अशी मागणी केलीये. तसेच त्यांचं आणि प्राजक्ताचं बोलणं झालं तिला या संपूर्ण प्रकाराचा मोठा धक्का बसला असल्याचं अमेय खोपकरांनी म्हटलं आहे. अमेय खोपकर यांनी एक्स पोस्ट करतही सुरेश धस यांना इशारा दिलाय. यावर आता आमदार सुरेश धस काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मी कोणत्याही कलाकाराचा अपमान सहन करणार नाही - अमेय खोपकर
एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना अमेय खोपकर यांनी म्हटलं की, या संदर्भात माझं इतकच म्हणणं आहे की, तुमचं जे काही घाणेरडं राजकारण आहे, ते तुम्हाला लखलाभो.. यामध्ये कुठल्याही प्रकारे मराठी कलाक्षेत्रात किंवा नाटकक्षेत्रातल्या अभिनेत्रींना ओढू नका. माझं प्राजक्तासोबत रितसर बोलणं झालंय. तिला खूप मोठा धक्का बसलाय.हास्यजत्रेच्या कार्यक्रमानिमित्त ते सगळेजण परळीला गेले होते, सत्कार सोहळा झाला होता. तेवढीच भेट झाली होती. त्यावेळी सत्कार करतानाचा फोटो काढून धन्यवाद साहेब असं म्हणून ट्विट केलं होतं. तेवढी झालेली आयुष्यभराची भेट, त्यावर हे लोक राजकारण करत असतील तर आम्ही तरी नाही खपवून घेणार. तुम्हाला तुमचं जे काही राजकारण करायचं असेल ते करा पण यामध्ये मराठी अभिनेत्रींना ओढू नका.मी मराठी कलाक्षेत्रातल्या कोणत्याही कलाकाराचा अपमान सहन करणार नाही.या सगळ्याचा निषेध व्हायला पाहिजे आणि सुरेश धस यांनी ताबडतोब माफी देखील मागितली पाहिजे.
अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं... - अमेय खोपकर
अमेय खोपकर यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं की, सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत.