Ravi Kishan Casting Couch: रवी किशन (Ravi Kishan) हे भोजपुरी आणि हिंदी इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. अनेक उत्तमोत्तम चित्रपट हे रवी किशन यांच्या नावावर आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास 450 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. अतिशय अशी चमकदार कारकिर्द त्यांची राहिलेली आहे. पण एक असा काळ होता, ज्यावेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रवी किशनसाठी इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं, त्यांचा प्रवास खूप कठीण होता. इतकच नव्हे तर त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना कास्टिंग काऊचचा अनुभव आल्याचंही स्पष्ट केलं.
बऱ्याचदा अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचचा अनुभव आल्याचं पाहायला मिळतं. पण रवी किशन यांनी केलेला हा धक्कादायक खुलासा सध्या बरीच खळबळ माजवत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे इंडस्ट्रीत पुरुषांना देखील कास्टिंग काऊचचा अनुभव येतो असा निष्कर्ष यावरुन काढला जात आहे.
रवी किशन यांनी म्हटलं?
रवी किशन यांनी नुकतीच शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, 'त्या काळात अनेकांनी माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण मी नेहमी शांत राहिलो आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. जेव्हा तुम्ही तरुण असता, सुंदर दिसता आणि तुमच्याकडे पैसे नसतात तेव्हा लोकांना तुमचा फायदा घ्यायचा असतो. हे केवळ चित्रपटसृष्टीतच नाही तर प्रत्येक क्षेत्रात घडते. मी बारीक होतो, लांब केस होते आणि कानातलेही घालायचो. त्यावेळी ही या गोष्टींचा खूप सामना केला होता.
पुढे रवी किशन यांनी म्हटल की, मी सगळ्यंना सांगू इच्छितो की, यशासाठी कोणताही शॉर्टकट स्वीकारू नका. मी अनेक लोक पाहिले आहेत ज्यांनी हा मार्ग स्वीकारला आणि आता पश्चात्ताप झाला. माझ्यासोबत इंडस्ट्रीत आलेले स्टार अक्षय कुमार आणि अजय देवगण हे सुपरस्टार झाले, पण मी माझी वेळ येण्याची वाट पाहत होतो.