Adinath Kothare Birthday : अभिनेता, दिग्दर्शक अशा भूमिका सांभाळत आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) हा कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आदिनाथचा जन्म 13 मे 1984 रोजी मुंबईत झाला. आज आदिनाथ त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने अनेकांनी त्याला शुभेच्छा देखील दिल्यात. त्याच्या अनेक सहकलाकारांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यासाठी पोस्ट देखील केली आहे. पण या सगळ्यात चाहत्यांना मात्र त्याची बायको उर्मिला कोठारे (Urmila Kothare) हिच्या पोस्टची उत्सुकता लागून राहिलीये.
आदिनाथ हा सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मुलगा आहे. महेश कोठारे यांनी देखील मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आदिनाथनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पाणी हा आदिनाथने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. विशेष म्हणजेच त्याच्या या पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
उर्मिलाच्या पोस्टची चाहत्यांना उत्सुकता
आदिनाथच्या वाढदिवसाला त्याच्या चाहत्यांसह अनेकांनी शुभेच्छा दिल्यात. पण यावेळी त्याची बायको उर्मिला कानेटकर कोठारे हिच्या पोस्टची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. कारण त्याचा वाढदिवस संपत आला तरीही उर्मिलाने पोस्ट केलेली नाही. आदिनाथ आणि उर्मिला हे मराठी इंडस्ट्रीतलं फेव्हरेट कपल आहे. या दोघांची लव्हस्टोरी देखील तितकीच फिल्मी आहे. आदिनाथ आणि उर्मिलाने 2011 मध्ये लग्नगाठ बांधली. तसेच या दोघांना जिजा नावाची एक मुलगी देखील आहे. आदिनाथ आणि उर्मिला या दोघींना अनवट यासारख्या चित्रपटातून एकत्र काम देखील केलं आहे. त्यामुळे आदिनाथ आणि उर्मिलाची ऑफस्क्रिन जोडी जितकी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली, तितकीच त्यांची ऑनस्क्रिन जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी पहिल्यांदाच एकत्र
अभिनेता आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी ही जोडी पहिल्यांदाच शक्तीमान या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचा हा सिनेमा येत्या 24 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटात मुख्य भूमिकेत आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी यांच्यासह प्रियदर्शन जाधव, ईशान कुंटे आणि विक्रम गायकवाड यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले असून निर्मिती मोशनस्केप एन्टरटेनमेंटने केली आहे .