Success Stoty : कधी कोणाचं नशीब बदलेल हे काही सांगता येत नाही. तुमच्याकडे जर प्रचंड इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचता. आज आपण अशातच एका जिद्दी तरुणाची यशोगाथा (Success Stoty) पाहणार आहोत. एकेकाळी हा मुलगा पुण्यातील इन्फोसिसमध्ये (Infosys) शिपाई (ऑफिस बॉय) म्हणून 9000 रुपये पगारावर काम करत होता. पण आज या मुलाचे आयुष्य बदलले आहे. त्याने स्वत:ची कंपनी उभी केली आहे. आज तो करोडो रुपयांचा मालक झालाय. दादासाहेब भगत  (dadasaheb bhagat) असं बीड (Beed) जिल्ह्यातील सांगवी या गावातील मुलाचं नाव आहे. 


कठोर परिश्रम आणि हार न माणण्याची तयारी असेल की कोणताही माणूस यशस्वी होतो. दादासाहेब भरतचा जन्म महाराष्ट्रातील एका छोट्या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. फारसे पैसे नसल्याने माझे शिक्षण फक्त आयटीआय पूर्ण केले होते. पैसे कमावण्यासाठी जेव्हा दादासाहेबने घर सोडले तेव्हा पुण्यातील इन्फोसिस कंपनीत शिपायाची (ऑफिस बॉय) नोकरी मिळाली होती. त्यावेळी पगार होता फक्त 9000 रुपये प्रति महिना. दादासाहेबचे वडील दुसऱ्याच्या शतात मजुरीचे काम करत होते. आज ते अलिशान बंगल्यात राहत आहेत. 


मुंबई पुणे हैदराबादमध्ये केलं काम


दादासाहेब भगतने दोन स्टार्टअप सुरु केले आहे. त्याचे ते सीईओ आहेत. इन्फोसिसमध्ये काम करत असताना दादासाहेबांनी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमधून मल्टीमीडिया डिप्लोमा केला. ऑफिसची ड्युटी रात्री 8 ते सकाळी 8 अशी होती. तर क्लाकेसची वेळ ही सकाळी 10 ची होती. कोर्स पूर्ण केल्यानंतर दादासाहेबांना मुंबईच्या रोटो कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्यांना हॉलीवूड चित्रपटांसाठी काम करण्याची संधी देखील मिळाली. काही काळ त्यांनी हैदराबादमध्ये देखील काम केलं.


अपघातानंतर सुचली कल्पना 


चांगला अनुभव घेतल्यानंतर दादासाहेब हे मुंबईत आले.  मॅजिक आणि कलर इंकमध्ये व्हिज्युअल इफेक्ट आर्टिस्ट म्हणून त्यांनी काम सुरु केलं. तसेच काही काळानंतर त्यानी पुण्यातही काम केलं. पुण्यात 2016 पर्यंत ग्राफिक स्पेशालिस्ट म्हणून काम केलं. दरम्यान, त्यांना कामातून चांगला पैसा मिळू लागल्यानंतर त्यांनी एक बाईक घेतली. त्यानंतर काहीच दिवसात त्यांचा अपघात झाला. यावेळी ते 15 दिवस अंथरुणावर पडून होते. यावेळी ते फ्रीलान्स काम शोधू लागले. अपघातानंतर विश्रांतीच्या काळात त्यांनी आग आणि धुरासाठी अनोखे ॲनिमेशन डिझाइन तयार केलं. यातून त्यांना पगारापेक्षा जास्त कमाई झाली. त्यांना पगार मिळायचा 28 हजार आणि डिझायीनमधून पैसे मिळायचे 40 हजार रुपये. यातूनच त्यांना व्यवसायाची कल्पना सुचली. 


2016 मध्ये दादासाहेबांनी नोकरी सोडून पूर्णवेळ व्यवसाय सुरु केला 


काही काळानंतर दादासाहेब यांनी नोकरी सोडून दिली आणि पूर्णवेळ व्यवसाय करु लागले. 2016 मध्ये त्यांनी पहिला स्टार्टअप नाइन्थ मोशन सुरु केले. हे स्टार्टअप ॲनिमेशन डिझाइन आणि डिजिटल आर्टसाठी काम करते. काम वाढल्यानंतर 2018 मध्ये पुण्यात त्यांनी एक कार्यालय सुरु केलं. तिथे 10 ते 15 लोकांची टीम काम करते. तिथे ॲनिमेशन बनवून ते इतर कंपन्यांना विकण्यास सुरुवात केली. 2018-19 मध्ये 48 लाख रुपयांचा व्यवसाय झाल्याची माहिती दादासाहेबांनी दिली.


कोरोनाच्या संकटात गावात आले


दरम्यान, 2020 मध्ये कोरोनाचं संकट आलं. या काळात कार्यालय बंद ठेवावं लागलं. पण या काळात भगत शहर सोडून गावात आले. त्यांनी जनावरांच्या गोठ्यातच कार्यालय उघडले. महामारीच्या कठीण काळात त्यांनी आपली टीम गावात आणली आणि डूग्राफिक्स नावाने एक नवीन स्टार्टअप सुरू केला. हे AI द्वारे ग्राफिक्स डिझाइनचे काम करते, जे कॅनव्हासारखे आहे. यानंतर उत्पन्न आणि उलाढाल वाढतच गेली. गेल्या वर्षी त्यांच्या कंपनीने एक कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती भगत यांनी दिली. दादासाहेब भगतने 'बोट (BOAT) या सुप्रसिद्ध हेडफोन कंपनीचे मालक अमन गुप्ता यांच्याकडून तब्बल 1 कोटींची गुंतवणूक मिळवण्यातही यश मिळवलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


घराच्या टेरीसवर महिलेनं केला अनोखा प्रयोग, 300 हून अधिक फळे फुले आणि भाज्यांची लागवड