Urmila Kothare : अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. कोठारेच्या कार अपघाताचा तपास स्टेट सीआयडी अथवा अन्य तपासयंत्रणेकडे सोपवा अशी मागणी तिने केली आहे. फौजदारी याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्रीनंच मुंबई उच्च न्यायालयात ही मागणी केली आहे.
दोन आठवड्यांनी होणार पुढील सुनावणी
या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्याची दखल घेत या अपघाताचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना हायकोर्टानं नोटीस जारी केलीय. त्यामुळे आता समता नगर पोलीस ठाण्याला दोन आठवड्यांनी होणाऱ्या पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं जारी केलेत.
नेमकं काय घडलं होतं?
24 डिसेंबरला 2024 रोजी कांदिवली परिसरात शूटींगवरून परतत असताना पोईसर मेट्रो स्थानकाजवळ अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारला हा अपघात झाला होता. या घटनेत एकाचा मृत्यूही झाला होता. याप्रकरणी अभिनेत्रीचे कार चालक गजानन पाल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
उर्मिला कोठारेच्या याचिकेत नेमके काय आहे?
उर्मिला कोठारने याआधी अपघाताच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची विनंती मुंबई पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र तिथं सीसीटीव्हीच नसल्याचं पोलीस सांगत आहेत. त्यामुळेच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
अपघात नेमका कशामुळे, मेट्रोच्या कामाचा फटका?
मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या ठिकाणी मेट्रोचं काम सुरु होतं. तिथं सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. तसेच वाहनांना दिशादर्शक फलकही दाखवलेले नव्हते. त्यामुळे कंत्राटदारही तितकाच जबाबदार असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे या याचिकेत नेमके काय होणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. दोन आठवड्यांनी उर्मिला कोठारेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
हेही वाचा :
सोनेरी ड्रेस, मोकळे केस, सोनम कपूरचा नो मेकअप लूक पाहिलात का? पाहा अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो!