Samay Raina India's Got Latent : कॉमेडियन समय रैना गेल्या काही दिवसांपासून कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्याच्या इंडियाज गॉट लेटेन्ट या शोवर देशभरातून आक्षेप घेतला जात आहे. या शोमध्ये अभद्र, अश्लील भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या शोचे सर्व एपिसोड यूट्यूबवरून काढून टाकावेत, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता समय रैनाने या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं मी हे सर्व प्रकरण माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे, असे म्हणत त्याने मोठा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
समय रैनाने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर इंडियाज गॉट लेटेन्ट या शोचा नवा भाग अपलोड केला होता. या भागात प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया कॉमेडियन्सच्या पॅनेलमध्ये बसलेला होता. त्याने विनोद करताना पालकांवर एक आक्षेपार्ह विधान केले. त्याच्या याच विधानानंतर इंटरनेटवर तसेच संपूर्ण भारतातून संताप व्यक्त करण्यात आला. रणवीर अलाहाबादिया तसेच समय रैनाने जाहीर माफी मागावी तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती.
समय रैनावर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात
या प्रकरणाला जास्तच हवा मिळाल्यानंतर रणवीर अलाहाबादियाने जाहीर माफी मागितली होती. सोबतच त्याने इंडियाज गॉट लेटेन्ट या शोमधील आक्षेपार्ह भाग काढून टाकावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर इंडियाज गॉट लेटेन्ट कार्यक्रमावर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या साधारण 30 ते 40 जणांना पोलिसांनी समन्स पाठवले होते. तसेच इंडियाज गॉट लेटेन्ट या शोचे काही भाग डिलिट करण्याचे निर्देश दिले होते.
समय रैनाची पहिली प्रतिक्रिया काय?
समय रैनाने याच प्रकरणावर आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एक्स या समाजमाध्यमावर इंग्रजी भाषेत मन मोकळं केलं आहे. सध्या जे काही घडत आहे, ते माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. माझ्याच्याने ते हाताळले जात नाहीये. मी इंडियाज गॉट लेटेन्ट या शोचे सर्व भाग यूट्यूबवरून हटवले आहेत. लोकांना हसवणे आणि त्यांचा चांगला वेळ जावा, हाच माझा यामागचा उद्देश होता. मी चौकशीसाठी सर्व संस्थांना सहकार्य करणार आहे, असे समय रैनाने म्हटलं आहे. रणवीर अलाहाबादियानंतर आता समय रैनाही माफी मागेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्याने आपल्या या ट्वीटमध्ये कोणताही माफी मागितलेली नाही. तसेच दिलगीरीही व्यक्त केलेली नाही.
हेही वाचा :