Shah Rukh Khan : सुपरस्टार शाहरुख खान केवळ अभिनयासाठीच नाही तर त्याच्या दिलदारपणासाठी देखील ओळखला जातो. आता त्याची मीर फाउंडेशन ही एनजीओ दिल्ली अपघातातील (Delhi Girl Accident) अंजली सिंगच्या  (Anjali Singh) कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. अंजलीच्या कुटुंबाला शाहरूख खानने आर्थिक मदत केली आहे. नवीन वर्षाच्या तोंडावरच अंजली सिंगला आपला जीव गमवावा लागला होता. स्कूटीला धडक दिल्यानंतर कारने फरफटत नेल्याने अंजलीचा मृत्यू झाला होता. अंजली ही कुटुंबात कमावणारी एकटीच होती. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठं संकट कोसळलं होतं. अशा परिस्थितीत शाहरूखने अंजलीच्या कुटुंबाचा खर्च उचलला आहे.   


मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या मीर फाउंडेशनने अंजली सिंगच्या कुटुंबाला मोठी रक्कम दान केली आहे. मात्र, किती रक्कम दिली आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. अंजली ही त्यांच्या घरातील एकमेव कमावती मुलगी होती, जी तिच्या कुटुंबाचा खर्च चालवत होती. मीर फाऊंडेशनने विशेषत: आजारी असलेल्या अंजली सिंगच्या आईसाठी आणि तिच्या भावंडांसाठी हे पाऊल उचलले आहे. मृत अंजलीच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले असून तिला दोन छोटी भावंडं आहेत. अंजलीच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचा आधारच हरपला आहे. हीच बाब लक्षात घेऊन शाहरूखच्या फाऊंडेशनने तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. शाहरूखच्या मीर फाऊंडेशनने यापूर्वी देखील अनेकांना मदतीचा हात पुढे केला आहे. 


मीर फाऊंडेशन महिलांच्या मदतीसाठी काम करते 


शाहरुख खानने त्याचे दिवंगत वडील मीर ताज मोहम्मद यांच्या नावाने मीर फाऊंडेशन ही एनजीओ स्थापन केली आहे. हे फाउंडेशन महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करते. यासाठी फाउंडेशनतर्फे अंजलीच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. शाहरूखची ही मदत अंजलीच्या कुटुंबासाठी लाख मोलाची ठरणार आहे.  


दरम्यान, शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यात शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. याशिवाय 2023 मध्ये शाहरुख खानचे 'जवान' आणि 'डंकी' हे सिनेमे रिलीज होणार आहेत. 'जवान'चे दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली करत आहेत. तर राजकुमार हिरानी 'डँकी'वर काम करत आहेत.  


महत्वाच्या बातम्या


दिल्लीच्या अंजली अपघात केसमध्ये नवा ट्विस्ट, रात्री दोन वाजता धावताना दिसली मैत्रीण, जाणून घ्या नेमकं काय घडलं त्या रात्री