Parbhani Hindu Muslim Unity: सर्वधर्म समभाव हा राज्यातील एकोप्याचा मोठा पाया आहे. परंतु मागच्या काही दिवसात राज्यभरात विविध धर्मात तेढ वाढण्याचे प्रकरण समोर येत असताना परभणीत मात्र हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन वारंवार पाहायला मिळत आहे. मुस्लिमांचा इजतेमा हिंदूंच्या जागेवर अन् हिंदूचे शिवपुराण चक्क मुस्लिमाच्या जागेवर परभणीत होत आहे. एवढच नाही तर या मुस्लिम बांधवाने शिवपुराणासाठी चक्क 15 एकर तूर आणि साडेतीन एकर हरभऱ्यावर नांगर फिरवलाय..
"जगात जर्मनी अन भारतात परभणी"अशी म्हण परभणीबाबत प्रचलित आहे. हे म्हणण्या सारखे नेमकं परभणीत असं काय आहे असा प्रश्न सर्वांना पडतो. त्याचे उत्तर आहे ते म्हणजे परभणीची माणसं.. कुणालाही आपलेसे करण्याची इथली परंपरा आहे..त्यातच सर्वधर्म समभावाने इथे सर्वच समाज बांधव वागतात..आता हेच बघा ना परभणीत आठ डिसेंबरला मुस्लिम समाजाचा इजतेमा पार पडला..तीन दिवस लाखो मुस्लिम बांधव इथे आले, धर्माची शिकवण घेतली. त्यांच्यासाठी इथे हिंदू बांधव मदतीला आहे..इजतेमा साठी हिंदूंची जमीन देण्यात आली, तसेच इतर सोयीसुविधांची हिंदु समाजातील तरुणांनी व्यवस्था केली होती..
येत्या 13 ते 17 जानेवारी दरम्यान परभणीत पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांचे विख्यात शिवपुराण शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आयोजित केले आहे. आता एवढा मोठा कार्यक्रम नेमका घ्यायचा कुठे असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र परभणीतील प्लॉटिंग व्यासायिक हाजी शोएब यांनी यासाठी पुढाकार घेऊन आपली ६० एकर जमीन या शिवपुराण कथेसाठी विनामूल्य वापरासाठी दिली. एवढेच नाही तर यातील 15 एकर वर त्यांची तूर आणि साडे तीन एकर वर लावलेल्या हरभऱ्यावर त्यांनी नांगर फिरवत हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमासाठी लाखोंचे नुकसान सहन केले आहे. जिथे शिवपुराण कथेची जोरदार तयारी सुरूय..
प्रदीप मिश्रा कोण आहेत..
42 वर्षीय प्रदीप मिश्रा हे मध्यप्रदेशच्या सिहोर येथील रहिवाशी आहेत .
प्रदीप मिश्रा हे अध्यात्मिक गुरु,कथावाचक,गायक आहेत.
ज्यांची सर्व प्रवचन हि शिवपुराणावर असतात .
देशभरात त्यांचे प्रवचन प्रसिद्ध आहे.
दरम्यान एक काळ असा होता राज्यात कुठेही धार्मिक वादाच्या घटना घडल्या तर त्याचे पहिले पडसाद परभणीत उमटायचे. मात्र मागच्या 10 ते 15 वर्षात परभणीकरांनी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक एकता जोपासलीय. जी इतर शहरांनी जोपासणे आज अत्यंत गरजेचे बनले आहे..