Saif Ali khan health updates : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर त्याच्या घरात चोराने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात सैफ अली खान याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. चोराने सैफच्या मानेवर आणि पाठीवर वार केल्याचे समजते. सैफ अली खानला मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता या प्रकरणात लिलावती रुग्णालयाच्या सीईओंनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. निरज उत्तमानी यांनी सांगितले की, सैफ अली खानला त्याच्या वांद्रे येथील घरी एका अज्ञात व्यक्तीने भोसकले आणि पहाटे 3.30 वाजता रुग्णालयात आणण्यात आले. सैफवर सहा वार करण्यात आल्या आहेत. तर दोन खोल जखमा झाल्यात आहेत. एक खोल जखम मानेजवळ झाली आहे. त्याच्यावर न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी, डॉ. उत्तमनी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमद्वारे शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच सैफ आली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देखील रुग्णालयाने दिली आहे.
नेमकं काय घडलं?
सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात रात्री अडीचच्या सुमारास चोर शिरल्याचे लक्षात आले. घरातील नोकरांशी चोराचा वाद सुरु होता. त्यावेळी सैफ अली खान तिकडे आला. त्याची चोराशी झटापट झाली. यावेळी चोराने धारदार शस्त्राने सैफ अली खानवर वार केले. यामध्ये सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर दुखापत झाली आहे. यानंतर सैफ अली खानला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
चार कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातील चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. घरात घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी या चार जणांना ताब्यात घेतलं आहे, त्याचबरोबर त्यांचे फोन देखील ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करण्यासाठी घरातील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे, त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या