Johnny Deep : तब्बल सहा आठवडे चाललेल्या मानहानीच्या खटल्यातून आता अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) याची निर्दोष सुटका झाली आहे. पूर्व पत्नी एम्बर हर्ड हिने केलेल्या आरोपांमुळे जॉनी डेप याला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. या आरोपांमुळे त्याच्या हातातील सर्व कामं काढून घेण्यात आली होती. इतकंच नाही तर, डिस्नीची लोकप्रिय चित्रपट सीरीज ‘पायरट्स ऑफ कॅरेबियन’मधूनही त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मात्र, आता चार वर्षानंतर पुन्हा एकदा डिस्नीने जॉनी डेपचा चेहरा त्यांच्या लाईट शोमध्ये दाखवल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.


डिस्नी लँडमध्ये दररोज होणाऱ्या खास लाईट शोमध्ये ‘पायरट्स ऑफ कॅरेबियन’चे व्हिडीओ दाखवण्यात आले. सोबतच या लाईट शोमध्ये तब्बल चार वर्षानंतर जॉनी डेपचा चेहरा ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’ म्हणून झळकला आहे. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक चाहत्यांनी जॉनी डेपच्या नावाचा जयजयकार केला होता. तर, काहींना हे जॉनी डेपच्या पुनरागमनाचे संकेत वाटत आहेत. जॉनीला पुन्हा एकदा ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’ म्हणून पडद्यावर पाहण्यासाठी सगळेच चाहते आणि प्रेक्षक आतुर झाले आहेत. मात्र, यावर अजून कुठलेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.



जॉनी डेपने जिंकला खटला!


हॉलिवूडचा सुपरस्टार जॉनी डेप आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्ड यांचा हाय-प्रोफाईल मानहानीचा खटला बराच काळ चर्चेत होता. जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यात मागील बऱ्याच काळापासून कायदेशीर लढाई सुरू होती, ज्यावर आता अखेर हा निकाल देण्यात आला आहे. दीर्घकाळ चाललेल्या या कायदेशीर लढाईत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सहा आठवडे चाललेल्या या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.


जॉनी डेप-एम्बर हर्ड मानहानीच्या खटल्यात, न्यायाधीशांनी जॉनी डेपच्या बाजूने निर्णय दिला. या खटल्यातील न्यायाधीशांनी एम्बर हर्डला या मानहानी खटल्यात दोषी ठरवले आणि निर्णय दिला की, जॉनी डेप यांनी आपली बदनामी झाल्याचे सिद्ध केले आहे. याव्यतिरिक्त, न्यायालयाने एम्बर हर्डला 10 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई आणि 5 दशलक्ष डॉलरचे दंडात्मक नुकसान असे एकूण 15 दशलक्ष डॉलर भरण्याचे आदेश दिले.


सहा आठवडे चालला खटला!


जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यातील हाय-प्रोफाइल कायदेशीर लढाई दरम्यान गेल्या सहा आठवड्यांपासून अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. गेल्या सहा आठवड्यात शंभरहून अधिक तास साक्षीदार साक्ष देत होते. साक्ष आणि वादविवाद अनेक तास सुरु होते. ज्युरीच्या सात सदस्यांनीही तासनतास चर्चा केली आणि त्यानंतर ज्युरी निर्णयावर पोहोचले.


हेही वाचा :