मुंबई : संपूर्ण देशात सध्या एकाच बातमीनं खळबळ आहे आणि ती म्हणजे कोरोनाचे दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वच लॉकडाऊन आहोत. अशामध्ये मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरणही बंद आहेत. सोशल डिस्टन्सिंग म्हणून जवळपास सगळ्याच कलाकारांनी आपापल्या घरातच सुरक्षित राहण्याचा पर्याय निवडला आहे. पण एका कालाकारानं घरात न राहता आपला डॉक्टरी पेशा या संकटसमयी उपयोगी आणण्याचं ठरवलं आहे.
अभिनेता डॉ. आशिष गोखले याने वैद्यकिय शिक्षण घेतलं आहे. आपलं मेडिकलचं प्रोफेशन सांभाळत आशिषनं त्याचा अभिनयाचा छंदही जोपासला आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली कठिण परिस्थिती लक्षात घेता सध्या आशिष त्याचा पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत घालवत आहे. आशिष गोखले यानं गब्बर इज बॅक, लव्ह यू फॅमेली सारखे हिंदी चित्रपट, कंडिशन्स अप्लाय, बाला, रेडी मिक्स, मोगरा फुलला सारखे मराठी चित्रपट तसेच अनेक हिंदी मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे. सोनी एन्टरटेन्मेट वाहिनीवरील 'तारा फ्रॉम सातारा' या मालिकेतील वरुण माने या भूमिकेसाठी आशिष सध्या प्रकाश झोतात होता.
डॉक्टर आशिष गोखले स्वत: फिटनेस फ्रिक आहे. तो नेहमी स्वत: च्या फिटनेसकडे काटेकोरपणे लक्ष देतो. आत्ताच्या घडीला पोलीस असो वा डॉक्टर त्यांची किती धावपळ होतेय हे आपण सगळे बघतोच आहोत. यात आपल्या मदतीचा हात म्हणून सेलिब्रिटी असूनही अभिनेता डॉक्टर आशिष गोखले दररोज 24 तास हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करत आहे.
दरम्यान, अनेक सेलिब्रिटी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी पीएम केअर फंडसाठी मदत केली आहे. तर अनेक उद्योजकही कोरोना बाधितांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.
संबंधित बातम्या :
Coronavirus | सारा अली खानसोबतच करिना, सैफनेही केली कोरोनाग्रस्तांसाठी मदत
Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत