कोल्हापूर : कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाचे संकट वाढल्यास आपल्याकडे पूर्ण तयारी असावी, नागरिकांना क्वॉरन्टाईन करता यावे म्हणून अनेक इमारतींचं रुग्णालयात रुपांतर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच पद्धतीने शिवाजी विद्यापीठातील वसतिगृह देखील आयसोलेशन म्हणून वापरता येतील असा विचार समोर आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने शिवाजी विद्यापीठाकडे 1000 बेडची मागणी केली आहे.


सध्या शिवाजी विद्यापीठ बंद असून परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशावेळी विद्यापीठातील वसतिगृहांचा वापर आयसोलेशन रुग्णालय म्हणून करता यावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विद्यापीठातील कोणत्या इमारतीमध्ये हे रुग्णालय उभारावं यावर चर्चा सुरु आहे.


कोरोना व्हायरसचं संकट अजून किती गडद होतं याबद्दल माहिती नाही. मात्र जर संकट वाढलेच तर नागरिकांना सुरक्षित ठेवता येईल यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारी करत आहे. जिल्हा प्रशासनाने अनेक हॉटेल्स आणि संस्थांना देखील मदत करण्याचं आवाहन केलं आहे.


उद्योजकाकडून थ्री स्टार हॉटेल क्वॉरन्टाईनसाठी खुलं
होम क्वॉरन्टाईनची सुविधा नसणाऱ्यांसाठी कोल्हापुरातील एका तरुण उद्योजकाने आपलं थ्री स्टार कॅटेगिरीमधील हॉटेल खुलं केलं आहे. 'स्वामी, श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई यांचे नातू सिद्धार्थ उदयसिह शिंदे यांचं हॉटेल कृष्णा इन ताराबाई पार्क परिसरात आहे. थ्री स्टार कॅटेगिरीमधील हे हॉटेल तात्पुरतं बंद करुन त्यामधील 28 रुम या कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी देण्याचे ठरवलं आहे. सर्व प्रशासकीय परवानगी घेऊन सिद्धार्थ शिंदे यांनी आपलं हॉटेल होम क्वॉरन्टाईनची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी खुलं केलं.


Coronavirus | कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात 1000 बेडचे आयसोलेशन रुग्णालय होणार?