Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतही दरवर्षी प्रमाणे होळी आणि धुळवड साजरी होणार आहे. कोणताही सण असला की, अरुंधतीची आधीपासूनच तयारी सुरू होते. इतकी वर्ष कुटुंबाच्या आनंदात आपला आनंद शोधणारी अरुंधती यंदा मात्र कोणत्याही बंधनात न अडकता आपल्या इच्छेनुसार सण साजरा करणार आहे. पण तिच्या या आनंदात देखील एक नवा ट्विस्ट येणार आहे.


नुकताच मालिकेचा एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधतीच्या घरात चोर शिरल्याचे दिसत आहे. घरात आपल्याशिवाय कुणीतरी असल्याचे कळताच घाबरलेली अरुंधती यशाला फोन करणार आहे.


मध्यरात्री अरुंधतीच्या घरात चोराचा शिरकाव!


देशमुखांच्या घरातून बाहेर पडलेली अरुंधती आता आशुतोषच्या मदतीने आपली स्वप्न पूर्ण करत आहे. आपला अपमान विसरून अरुंधती आता एका नव्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रवासाची सुरुवात तिने देशमुखांच्या घरातून वेगळं होण्यापासून केली आहे. ‘समृद्धी’ बंगला सोडून आता अरुंधती स्वतःच्या वेगळ्या घरात राहायला गेली आहे. मात्र, तिच्या याच घरात आता चोर शिरणार आहे.


यश पकडणार चोराला!


अरुंधती झोपलेली असताना तिला स्वयंपाक घरातून काहीतरी खाली पडल्याचा आवाज येतो. यावेळी अरुंधतीला घरात कोणीतरी शिरल्याची चाहूल लागते. घाबरलेली अरुंधती लगेच यशला फोन करते आणि घरात कुणीतरी शिरल्याचं सांगते. यानंतर यश तिला धीर देत शांत राहायला सांगतो आणि लगेचच तिच्या घरी पोहोचतो. यश दारापाशी आल्यावर अरुंधतीला फोन करून हळूच दरवाजा उघडण्यास सांगतो.


आत आल्यानंतर सोफ्यामागे लपलेल्या चोराची चाहूल त्यालाही लागते. तेव्हा जवळच असलेली एक वस्तू उचलून तो त्या चोरावर हल्ला करणार, इतक्यात तो मारायला उचलेला हात खाली करतो. हा चोर दुसरा तिसरा कुणी नसून, स्वतः अनिरुद्ध असणार आहे. आता अनिरुद्धचा अरुंधतीच्या घरात चोरपावलांनी शिरकाव करण्यामागचा नेमका हेतू काय असणार आहे, हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. रविवारी (20 मार्च) या मालिकेचा एक तासांचा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha