'काळुबाई'च्या सेटवर कोरोनाची धाड; 27 जण संक्रमित, आशालता यांची प्रकृती चिंताजनक
'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या सेटवरील 27 जण कोरोनाबाधित, आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या माझी आई काळुबाई या मालिकेच्या सेटवर कोरोनाने धाड टाकल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यात या मालिकेचं चित्रिकरण सुरू असताना या सेटवरच्या तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय, या मालिकेतील महत्वाच्या भूमिकेत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.
आई माझी काळूबाई ही मालिका लॉकडाऊननंतरच्या काळात सुरू झाली. या मालिकेत प्राजक्ता गायकवाड, अलका कुबल, आशालता वाबगावकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेचा तामझाम मोठा आहे. या मालिकेत गाण्याचं चित्रिकरण चालू होतं. त्यासाठी काही मंडळी मुंबईतून आली होती. साताऱ्याजवळ असलेल्या खानविलकर फार्महाऊसवर या गाण्याचं चित्रिकरण सुरू होतं. तिथे कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातून 27 जण कोरोना बाधित झाले. तर ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांची प्रकृती मात्र कोरोनाच्या संसर्गानंतर चिंताजनक बनली आहे. सध्या त्या साताऱ्यातल्या रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहेत. याबद्दल या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
तब्बल 18 वर्षांचा 'हा' नियम अक्षय कुमारने मोडला!
यावेळी बोलताना अलका कुबल म्हणाल्या, 'सेटवर कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले. त्यामुळे लागण झालेली सगळीच मंडळी आता त्यातून बाहेर येत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांना मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे.'
अलका कुबल या मालिकेच्या निर्मात्याही आहेत. आशालता यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून त्या रुग्णालयातच आहेत. शिवाय, खानविलकर फार्महाऊसचा सर्व परिसर सध्या सील करण्यात आला आहे. इथलं चित्रिकरण थांबवण्यात आलं असून, आता ते मुंबईत हालवण्यात आलं आहे. फिल्मसिटीमध्ये याचं चित्रिकरण सुरू होणार आहे.
मुंबईत कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर मुंबई बाहेर चित्रिकरण करण्याचा पर्याय अनेकांनी निवडला. म्हणूनच सातारा हे शहर निवडण्यात आलं. तिथे सर्व उत्तम रीतीने चालू असताना, एका गाण्याचा चित्रिकरणासाठी मुंबईहून काही डान्सर्स आल्याचं कळतं. त्यांची कोव्हिड चाचणी न झाल्याने हा प्रकार झाल्याचा दावा स्थानिक रहिवाशी करू लागले आहेत. यातलं सत्य अद्याप समोर आलेलं नाही. पण सेटवर कोरोना होऊन आशालता यांची तब्येत खालावल्यानं पुन्हा एकदा कोरोनाने निर्माण झालेली गंभीर स्थिती अधोरेखित झाली आहे.
Coronavirus | 'आई माझी काळुबाई 'च्या सेटवरील 27 जण कोरोना पॉझिटिव्ह