अकोला : महाराष्ट्र राजकीय घडामोडी आणि रणधुमाळीत पार रंगून गेला आहे. पक्षांतर, चढाओढ, शह-काटशह असं सारं काही. हे सारं चाललंय सत्ता अन् त्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या आमदारकीसाठी. पक्षाची आमदारकी पाहिजे असेल तर त्यासाठी महत्त्वाचा आहे 'एबी फॉर्म'. काल शिवसेनेन राज्यातील अनेक ठिकाणच्या उमेदवारांना 'एबी फॉर्म' दिले. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातून शिवसेनेचा 'एबी फॉर्म' मिळालेल्या नितीन देशमुखांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. कारण, आता त्यांचं तिकीट कन्फर्म झालं आहे.


निवडणूक प्रक्रियेत याच 'एबी फॉर्म'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, यामुळेच संबंधित उमेदवार हा 'एबी फॉर्म' देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमदेवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचं अधिकृत चिन्हंही दिलं जातं. 


काय आहे 'एबी फॉर्म'?

* एबी फॉर्म' हा पक्ष आणि त्या पक्षाचं अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.

* ए फॉर्म' हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे.

* ए फॉर्म'वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.

* 'बी फॉर्म' हा अधिकृत उमेदवारासंदर्भातील दस्तावेज आहे.

* 'बी फॉर्म'वर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नावं असतं. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करु शकतो.

 

उमेदवारी अर्ज भरताना सर्वच गोष्टी अगदी काटेकोरपणे तपासल्या जातात. त्यात 'एबी फॉर्म' हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. उमदेवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला 'एबी फॉर्म' द्यावाच लागतो. तो 'एबी फॉर्म' सादर करु शकला नाही तर त्याचा दावा न्यायालयही ग्राह्य धरत नाही.

सध्याची राजकीय लढाई ही प्रामुख्याने तिकीटासाठी आहे. म्हणजेच राजकारणाचं चक्रव्यूहच 'एबी फॉर्म'चं भेदण्यासाठी असतं. त्यामुळे याच 'एबी फॉर्म'वरुन पुढच्या आठवडाभरात महाराष्ट्रात रणकंदन माजणार आहे हे मात्र निश्चित.

अतिरिक्त आणि महत्त्वाची माहिती

आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवतात. त्यांना संबंधित राजकीय पक्षाकडून 'ए' फॉर्म दिला जातो. त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्रं, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात. काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरु शकतो. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो. अशा वेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून 'बी' फॉर्म दिला जातो. त्यात प्रथम पसंतीच्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचं नाव दिलेलं असतं. जर पडताळणीदरम्यान अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यास किंवा त्याने उमेदवारी मागे घेतल्यास पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो. राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म 'एए' आणि 'बीबी' म्हणून ओळखले जातात.