शिर्डी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी युतीमध्ये ताळमेळ नसून संशयास्पद वातावरण असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पाच वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेला पीक विम्यासाठी आंदोलन करावं लागलं. शिवसेना-भाजप एकत्र लढले तरी त्यांच्यात आलबेल नसल्याचं स्पष्टपणे दिसत असल्याचा टोला थोरातांनी लगवला.


विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेकांची अर्ज दाखल करण्याची लगबग दिसून आली. संगमनेर विधानसभेसाठी बाळासाहेब थोरात यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करतेवेळी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, आमदार सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांसह राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते.




सोमवारी आपल्या निवासस्थानाहून प्रांतकार्यालयात पायी जात बाळासाहेब थोरातांनी अर्ज दाखल केला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाळासाहेब थोरात यांनी शक्ती प्रदर्शन केलं. जनतेच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित असल्याचं थोरात यांनी सांगितलं. तर आघाडीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात येणार असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.




VIDEO | संगमनेर मतदारसंघात विखे पाटील थोरातांना अडचणीत आणणार? | लेखाजोखा मतदारसंघाचा