रत्नागिरी-सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. कोकणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना बसलेला मोठा धक्का आहे. नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत निलेश राणे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. राणेंच्या राजकीय अस्तित्त्वासाठी देखील ही निवडणूक महत्त्वाची होती. मात्र दुसऱ्यांदा पराभवामुळे नारायण राणेंची पुढील राजकीय कारकीर्द कशी असणार, त्यांच्या पराभवाची कारणं काय, यावर आता चर्चा सुरु झाली आहे.


सलग दुसऱ्यांदा विनायक राऊत विजयी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी सलग दुसऱ्यांदा निलेश राणेंचा 1 लाख 78 हजार 322 मतांनी पराभव केला. त्यामुळे नारायण राणेंचा बालेकिल्ला आता त्यांचा राहिला नसल्याचं चर्चा सुरु आहे. 2014 पेक्षा जास्त मतं विनायक राऊत यांनी यावेळी मिळवली आहेत.

शिवसेनेचं एकहाती वर्चस्व असलेल्या रत्नागिरीत जिल्ह्यात नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांचं जाळं नाही. एकीकडे कोकणात 2014 प्रमाणे यावेळी ॲन्टी राणे लाट नसताना आणि दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा असहकार असतानाही विनायक राऊत यांना 2014 च्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं.

नारायण राणेंचं यापुढे राजकीय अस्तित्त्व काय असणार?
नारायण राणे यांच्या राजकीय अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण राणे यांचा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणे यांचा 2014 आणि 2019 या दोन वेळा विनायक राऊत यांच्याकडून पराभव झाला. राणे-पिता पुत्राचा दोन वेळा पराभव झाल्यामुळे, राणेंच्या राजकीय अस्तित्त्वाची लढाई संपुष्टात येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोकणात विकास करुन सुद्धा लोक नाकारतात, त्यामुळे राजकारण करावं का असा प्रश्न नारायण राणे यांनी काल माध्यमांशी उपस्थित केला.

राणेंना आत्मचिंतनाची गरज
कोकणातील जनतेने का नाकारलं याचं आत्मचिंतन करण्याची गरज नारायण राणेंना आहे. येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे तळकोकणात राणेंना कमबॅक करायचं असेल तर पराभवाची कारणं शोधून आत्मचिंतन कारण गरजेचं आहे.