लंडन : अवघ्या काहीच दिवसात इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. कोणता संघ विश्वचषक जिंकणार यासोबतच कोणता संघ सर्वोच्च धावसंख्या उभारणार याबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हल्ली सर्वच संघ अगदी सहजपणे 300 पेक्षा जास्त धावसंख्या उभारतात. त्यामुळे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच 500 धावसंख्या उभारली जाईल, असे अंदाज लावले जात आहे.

500 धावसंख्येबाबत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला विचारले असता कोहली म्हणाला की, "500 धावसंख्या उभारता येऊ शकते. इंग्लंडचा संघ हा विश्वविक्रम करु शकतो. सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम सध्या त्यांच्याच नावावर आहे."

इंग्लंडच्या संघाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. सहा विकेटच्या बदल्यात 50 षटकात इंग्डंलने 481 धावा केल्या होत्या.

वर्ल्डकप खेळणाऱ्या सर्व संघांच्या कर्णधारांनी आज लंडनमधील एका पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. यावेळी विराट कोहलीने इंग्लंडच्या संघावर विश्वास दाखवला.

विराटला 500 धावांबाबत विचारल्यावर विराट इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनकडे इशारा करत म्हणाला की, "ही गोष्ट यांच्यावर अवलंबून आहे. मला असं वाटतं की दुसऱ्या कोणत्याही संघाअगोदर हा रेकॉर्ड इंग्लंडचा संघ करेल."