मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक सेलिब्रेटींनी आपलं नशिब आजमावलं. लहान-मोठ्या पडद्यावर झळकलेले काही कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, तर काही क्रीडापटूंनीही राजकीय मैदानात उडी घेतली होती. सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या अमोल कोल्हे, स्मृती इरानी, सनी देओल, गौतम गंभीर यांनी पहिल्यांदा लोकसभेत एन्ट्री घेतली आहे. तर उर्मिला मातोंडकर, जया प्रदा, प्रकाश राज यांना पराभवाचा सामना करावा लागला.

हार-जीतचा सामना केलेले 24 सेलिब्रेटी

1. हेमा मालिनी - उत्तर प्रदेशातील मथुरेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हेमा मालिनी पुन्हा एकदा खासदारपदी निवडून आल्या आहेत. रालोद उमेदवार कुंवर नरेंद्र सिंह आणि काँग्रेस उमेदवार महेश पाठक यांचा हेमा मालिनींनी पराभव केला.

2. बाबुल सुप्रियो vs मूनमून सेन - पश्चिम बंगालमधील आसनसोलमधून प्रसिद्ध गायक आणि केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो भाजपच्या तिकीटावर पुन्हा निवडून आले आहेत. तृणमूल काँग्रेसकडून रिंगणात उतरलेल्या दिग्गज अभिनेत्री मूनमून सेन यांना पराभवाचा सामना करावा लागला. जवळपास दोन लाखांचं मताधिक्य सुप्रियोंना मिळालं.

3. स्मृती इरानी - गेल्या वेळी लोकसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्रिपद भूषवलेल्या स्मृती इरानी यंदा अमेठीतून निवडून आल्या आहेत. भाजपतर्फे निवडणुकीत उतरलेल्या स्मृती यांनी तीन वेळा खासदार राहिलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभवाची धूळ चारली.

4. अमोल कोल्हे - राष्ट्रवादीचे उमेदवार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी सलग तीन टर्म खासदार राहिलेले शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. अमोल कोल्हेंनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

5. नवनीत कौर राणा - महाआघाडीत सामील झालेल्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी खासदारकी मिळवली आहे. अमरावतीतून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचं संस्थान नवनीत यांनी खालसा केलं.

6. जया प्रदा - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या अभिनेत्री जया प्रदा यांचं खासदारकीचं स्वप्न भंगलं. 5 लाख 59 हजार 177 मतं मिळवत खान यांनी उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून विजय मिळवला.

7. उर्मिला मातोंडकर - काँग्रेसतर्फे उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचाही दारुण पराभव झाला. भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी आपला मतदारसंघ राखत पुन्हा लोकसभेत एन्ट्री घेतली आहे. शेट्टींना सात लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली, तर उर्मिला यांच्या पदरात 2 लाख 41 हजार 431 मतं पडली.

Uddhav on Raj | लाव रे ते फटाके, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला | मुंबई


8. शत्रुघ्न सिन्हा - ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा आवाज पाटणासाहिबमध्ये 'खामोश' झाला आहे. भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी जवळपास तीन लाखांच्या मताधिक्याने सिन्हा यांचा पराभव केला.

9. सनी देओल - भाजपच्या तिकीटावर मैदानात उतरलेला अभिनेता सनी देओलचा 'ढाई किलोचा हात' काँग्रेसच्या हाताला भारी पडला. पंजाब प्रदेशाध्यक्ष आणि गुरुदासपुरचे खासदार सुनील जाखड यांचा सनीने पराभव केला.

10. प्रकाश राज - सिंघम चित्रपट फेम जयकांत शिकरे अर्थात अभिनेते प्रकाश राज यांचाही दणदणीत पराभव झाला. बंगळुरु मध्य मतदारसंघातून ते अपक्ष लढले, मात्र त्यांना केवळ 28 हजार मतंच मिळाल्याने ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. भाजपचे पी सी मोहन 6 लाखांपेक्षा अधिक मतं मिळवत इथे विजयी झाले. तर काँग्रेस उमेदवार दुसऱ्या स्थानावर आला.

11. निरहुआ - यूपीतील आजमगडमधील भाजप उमेदवार आणि गायक-अभिनेता दिनेश लाल यादव 'निरहुआ' रिंगणात उतरला होता. मात्र उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी निरहुआचा पराभव केला.

12. मनोज तिवारी - भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवलेला भोजपुरी अभिनेता मनोज तिवारीने दिल्ली उत्तर पूर्व ही जागा जिंकली. काँग्रेसच्या नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा त्याने पराभव केला.

13. रवी किशन - भोजपुरी अभिनेता रवी किशन भाजपच्या तिकीटावर गोरखपूरमध्ये जिंकला. तीन दशकं भाजपचा दबदबा असलेली ही सीट समाजवादी पक्षाचे नेत प्रवीण निषाद यांनी पोटनिवडणुकीत जिंकली होती. मात्र रवी किशनने ही जागा पुन्हा खेचून आणली.

14. गौतम गंभीर - तब्बल 6 लाख 96 हजार 156 मतं मिळवत भाजप उमेदवार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर पूर्व दिल्लीत विजयी झाला. काँग्रेसच्या अरविंद सिंह लवली आणि आपच्या अतिशी मार्लेना यांचा गंभीरने पराभव केला.

15. किरण खेर - अभिनेत्री किरण खेर पुन्हा एकदा खासदारपदी निवडून आल्या आहेत. काँग्रेसच्या पवन कुमार बंसल यांचा खेर यांनी पराभव केला.

16. विजेंद्र सिंह - काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणारा माजी बॉक्सर विजेंद्र सिंह याला 'नॉक आऊट पंच' मिळाला. भाजपच्या विद्यमान खासदाराकडून दक्षिण दिल्लीत त्याचा पराभव झाला. भाजपच्या रमेश बिधूडी यांनी तीन लाख 67 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. नाव विजेंद्र असलं, तरी पराभूत झालेल्या विजेंद्रचं डिपॉझिट जप्त झालं.

17. हंसराज हंस - उत्तर पश्चिमी दिल्लीतून पहिल्यांदा निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार, गायक हंसराज हंस यांनी विजयश्री प्राप्त केली. काँग्रेसचे राजेश लिलोठिया आणि आम आदमी पक्षाच्या गुग्गन सिंह रंगा यांचा पराभव झाला.

18. राज्यवर्धन सिंह राठोड vs कृष्णा पुनिया - भाजप उमेदवार, केंद्रीय मंत्री आणि नेमबाज राज्यवर्धन सिंग राठोड यांनी 8 लाख 20 हजार 132 मतं मिळवत विजय मिळवला. काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात उतरलेली थाळीफेकपटू कृष्णा पुनिया हिला हार पत्करावी लागली.

19. पूनम सिन्हा - शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी आणि अभिनेत्री पूनम सिन्हा यांनी लखनौ लोकसभा मतदारसंघातून गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरोधात सपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र सिन्हा यांना विजय मिळवता आला नाही.

20. नुसरत जहां - पश्चिम बंगालच्या बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली बंगाली अभिनेत्री नुसरत जहां विजयी झाली. तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या नुसरतला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला होता.

21. भगवंत मान - पंजाबमधील संगरुरमधून आपच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे अभिनेते भगवंत मान विजयी झाले. या ठिकाणी भाजप उमेदवार नव्हता. काँग्रेसच्या केवल सिंग धिल्लन यांना मान यांनी पराभूत केलं.

22. राज बब्बर - काँग्रेस उमेदवार आणि अभिनेते राज बब्बर फतेहपूर सिक्रीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या राजकुमार चहर यांनी ही जागा जिंकली