नागपूर : राज्य सरकारने यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात लाडकी बहीण योजना राबवल्याने निवडणूक प्रचारातही ही योजना महत्त्वाची आणि जमेची बाजू ठरली. महिलांना उद्देशून किंवा त्यांचे मताधिक्य डोळ्यासमोर ठेऊनच राजकीय नेत्यांनी प्रचार केला. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहीण केंद्रस्थानी होती. त्यामुळेच, यंदा मतदानचाी टक्केवारी वाढल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना याबाबत विचारणा केली असता, शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, एक्झिट पोलच्या आकडेवारीवर आमचे प्रवक्ते बोलतात, नेते नाहीत असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला. नागपूर येथील विमानतळावर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी महायुतीलाचा बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.  


मतदानाची टक्केवारी जेव्हा जेव्हा वाढते, तेव्हा भाजपा आणि मित्रपक्षाला याचा फायदा होतो. त्यामुळे, अपेक्षा आहे, निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होईल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार स्थापन होईल, अशी मला अपेक्षा आहे. मी 25 ते 30 मतदारसंघात फोनवरुन संपर्क साधला, त्यांचे प्राथमिक अंदाज आहेत की यंदाच्या निवडणुकीत महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याची शक्यता आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले. भाजपकडून अपक्षांशी संपर्क साधला जातोय का, या प्रश्नावर आम्ही अद्याप तरी कोणालाही संपर्क साधला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, विधानसभा निवडणूक निकालादिवशी आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊ, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.   


राज्यात 65.1 टक्के मतदान


राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदारांनी 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत काढताना भरभरून मतदान केलं आहे. 2024 च्या सर्वात लक्षवेधी आणि राजकारणाची खिचडी झाली असतानाच 65.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. दोन्ही पक्षांचे मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. राज्यातील मतदानाचा उच्चांक कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) झाला असून 76 टक्के मतदान झालं आहे. राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात 84.79 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, मतदानानंतर काल एक्झिट पोल आले आहेत. यानुसार महायुतीच्याच जागा जास्त येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या याबाबतची खरी परिस्थिती 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे. 


हेही वाचा


प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी