मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सचे निकाल समोर आले होते. यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला (Mahayuti) संमिश्र कौल मिळाल्याने संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीने (Mahavikas Agahdi) फासे टाकायला सुरुवात केली आहे. राज्यात कोणत्याही आघाडीला बहुमत न मिळाल्यास अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरु शकते. त्यामुळे आता महाविकास आघाडीने बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे.


मतदान संपल्यानंतर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. तर दुसरीकडे गुरुवारी सकाळपासून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत.  बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांच्या माध्यमातून जे बंडखोर विजयी होऊ शकतात, त्यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात झाली आहे. मविआच्या नेत्यांनी निकालापूर्वीच बंडखोर आणि अपक्षांशी संपर्क साधायला सुरुवात केल्याने महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. 


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे हा वाढीव टक्का कोणासाठी फायदेशीर ठरणार, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर झाल्यास कोणालाही बहुमत मिळणार नाही, अशाप्रकारचेही अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशावेळी बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या 145 जागा गाठण्यासाठी  अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरु शकते. केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे अपक्षांचा ओढा साहजिकच महायुतीकडे असण्याची शक्यता आहे.  त्यादृष्टीने महाविकास आघाडीने आतापासूनच अपक्ष आणि बंडखोरांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता येत्या काही तासांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य


एक्झिट पोल्सचे निकाल समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांची वाढलेली संख्या ही महत्त्वाची गोष्ट असल्याचे सांगितले. मी एक्झिट पोल्सच्या निकालाबाबत बोलणार नाही, त्याबाबत आमचे प्रवक्ते बोलतील. आम्ही अद्याप कोणत्याही अपक्ष उमेदवाराशी संपर्क साधला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


आणखी वाचा


मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?


एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास


अजित पवार सहाव्या स्थानावर, तरीही किंगमेकर होणार? बार्गेनिंग पॉवरमुळे मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण होणार?