लखनौ: उत्तर प्रदेशची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय वातावरण तापू लागलंय. ही निवडणूक भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी अशीच होणार हे आतापर्यंत स्पष्ट झालंय. खेळाची आवड असलेले अखिलेश यादव हे राजकीय मैदानावर भाजपच्या हिट विकेट्स काढताना दिसत आहेत. बाप राजकारणातील शेर पण पोरगा सव्वाशेर असल्याचं एव्हाना अखिलेश यांनी सिद्ध केलंय. समाजवादी पक्षाची संपूर्ण धुरा एकहाती सांभाळणाऱ्या अखिलेश यादव यांची एकेकाळी याच पक्षातून हकालपट्टी झाली होती.
अखिलेश मुख्यमंत्री अन् यादव कुटुंबात गृहकलह
सन 2012 साली अखिलेश यादव मुख्यमंत्री झाले आणि मुलायम सिंह यादवांनी पक्षाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली. तेव्हा कनौजमधून अखिलेश यादव खासदार होते. त्यांच्या जागी पत्नी डिंपल यादवांनी लोकसभेत एन्ट्री घेतली आणि राज्यात पॉवर कपल अशी त्यांची ओळख बनली. अखिलेश यांचं राजकीय प्रस्थ वाढत असतानाच यादव कुटुंबात गृहकलह सुरु झाला. काही दिवसांआधीच मुख्यमंत्री झालेल्या अखिलेश यादवांच्या खऱ्या संघर्षाला तिथूनच सुरुवात झाली.
मुलायम सिंह यांनी अखिलेश यांच्या सरकारवर आपला दबाव कायम ठेवला. अखिलेश हे वयानं लहान आणि अनुभवानं कमी असल्यानं मुलायम यांच्यासह काका शिवपाल यादव आणि आझम खान यांनीही त्यांच्या सरकारमध्ये मनमानी सुरु केली. हाच परिवारवाद जून 2016 मध्ये अगदी टोकाला पोहोचला.
मुख्यमंत्रीपद सोडण्याची धमकी
उत्तर प्रदेशातले गँगस्टर मुख्तार अन्सारी यांच्या कौमी एकता दलाचं समाजवादी पक्षात विलिनीकरण करण्याची घोषणा शिवपाल यादव यांनी केली. तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या अखिलेश यादव यांनी त्या विलिनीकरणाला विरोध केला. इतकंच नाही तर त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचीही धमकी दिली.
त्यानंतर हे विलिनीकरण थांबलं खरं पण काका शिवपाल आणि अखिलेश यांच्यांमधलं भांडण आणखी वाढलं. हाच संघर्ष उघडपणे जनतेसमोरही सुरु झाला. त्या काळात वर्तमानपत्रांमध्ये अखिलेश यादवांची तुलना मुघल शासक औरंगजेबाशी करण्यात आली. हा वाद सुरु असतानाच, नव्या विधानसभेचं वारं वाहू लागलं. भाजपनं लोकसभेत मिळवलेला विजय ध्यानात घेऊन समाजवादी पक्षानं प्रचार सुरु केला.
...अन् अखिलेश यांची हकालपट्टी झाली
त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या अखिलेश यादवांनी 29 डिसेंबर 2016 रोजी 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. पण त्यांच्या याच घोषणेमुळे समाजवादी पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली. पक्षाच्या घटनेचा भंग केल्याचा दावा करून 30 डिसेंबर 2016 रोजी नेताजी मुलायमसिंह यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादवांची थेट पक्षातून हकालपट्टी केली.
अखिलेश यादवांसोबतच रामगोपाल यादवांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पण अवघ्या 24 तासांमध्ये त्यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली. त्यानंतर वाटलं की अखिलेश यादवांसह समाजवादी पक्षातला वाद संपला असेल. पण काही दिवसांत म्हणजे जानेवारी 2017 मध्ये रामगोपाल यादवांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. त्यात अखिलेश यादवांना एकमतानं राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात आलं. तर मुलायमसिंह यांना मार्गदर्शक मंडळात टाकण्यात आलं.
दुसरीकडे मुलायमसिंह यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पण त्याचा फायदा झालाच नाही. अशा पद्धतीने राजकारणात मुरलेल्या बापाविरोधातच राजकीय डावपेच करुन आणि पक्षांतर्गत विरोधकांना चितपट करुन अखिलेश यादव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले.
आज अखिलेश यादव हेच समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. या तरुण नेत्याने उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीत आता थेट मोदी अन् योगींना आव्हान दिलं आहे आणि उत्तर प्रदेशच्या जनतेला आपण राजकीय पर्याय असल्याचं सांगितलं आहे. आता खेळाडू असलेले अखिलेश मोदीं-योगींची विकेट काढतात की त्यांचीच स्वत:ची हिट विकेट जाते हे लवकरच समजेल.
महत्त्वाच्या बातम्या :
- Uttar Pradesh: फुटबॉलर ते सर्वात तरुण मुख्यमंत्री...; म्हणून अखिलेश यांचं नाक वाकडं! जाणून घ्या काय आहे किस्सा
- UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशात आजपासून पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; 'या' जागांवर चुरस
- UP Election 2022: 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतमला काँग्रेसकडून उमेदवारी; कोण आहे अर्चना?