मुंबई: राजकीय भूमिका घेतल्याने स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून अभिनेता किरण माने यांना काढल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरल्याचं दिसून येतंय. 


या झुंडशाहीविरोधात आवाज उठवला गेला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चित्रपट, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मांडले आहे. किरण माने यांनी यापुढे स्वतःला एकटे समजू नये, त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस व संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असे बाबासाहेब पाटील म्हणाले. किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीने सन्मानाने परत मालिकेत घ्यावे अन्यथा 'मुलगी झाली हो' या मालिकेचे पुढील भाग चित्रित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 


बाबासाहेब पाटील म्हणाले की, "शरद पोंक्षे, आरोही वेलणकर, कंगना रनौत, अनुपम खेर यांच्यासारखे कलाकार उघड-उघड भाजप समर्थनार्थ आपले मत मांडत असतात. अशावेळी त्यांना चित्रपट किंवा नाटकातून काढण्यात येत नाही. या उलट त्यांना पद्मश्री, एफटीआय मधील मोठी लाभाची पदे देऊन सन्मानित केले जाते. मात्र दिल्लीतील शेतकरी आंदोलन वा इतर सामाजिक आंदोलनांवर भाष्य केल्यानंतर किरण मानेंसारख्या एका हरहुन्नरी कलाकाराला अशी वागणूक दिली जाते हे अशोभनीय आहे. या देशात प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यांनी काय बोलावे, काय लिहावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. अशा वेळी कुठलीही वाहिनी वा कंपनीने कलाकारांच्या वैयक्तिक जीवनातील मतप्रवाहांचे राजकारण करून एखाद्या कलाकाराची उपजीविका हिरावून घेणे, ही बाब अन्यायकारक व निंदनीय आहे. सांस्कृतिक क्षेत्र हे जनजागृतीचे एक उत्तम माध्यम आहे. अशावेळी प्रत्येक कलावंताची किंवा प्रत्येक व्यक्तीची मते वेगळी असू शकतात. त्याच्या वैयक्तिक मतासाठी अशा प्रकारचे कृत्य करणे म्हणजे हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आहे."


एका मुलाखतीमध्ये किरण यांनी सांगितले होते की, माझ्या राजकीय भूमिकेमुळे मला मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे. त्यानंतर किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ' काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !' किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :