UP Assembly Election 2022 : विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपसमोर सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीने जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. अशातच भाजपने आता सावध पवित्रा घेतला आहे. या निवडणुकांसाठी भाजपने आपले मित्रपक्ष असलेल्या निषाद पार्टी आणि अपना दल यांना जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निषाद पार्टीला भाजपने 10 जागा दिल्या आहेत. तर अपना दल या पक्षाला 18 जागा देण्यात आल्याची माहिती मिळते आहे. या दोन्ही पक्षांनी काही काही ठिकाणच्या आपल्या उमेदवारांच्या नावांची देखील घोषणा केली आहे.


दरम्यान, भाजपने यापूर्वीच सांगतिले होते की, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा निषाद पार्टी आणि अपना दल यांच्याबरोबर लढवणार आहोत. मागच्या काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत मित्र पक्षांबरोबर भाजपची चर्चा सुरू होती.  मात्र, कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत खुलासा झालेला नव्हता. अखेर सुत्रांच्या माहितीनुसार जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. दरम्यान, या निवडणुकांबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये यावेळी एनडीए 300 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला आहे. तसेच कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार यावर देखील चर्चा झाल्याची माहिती नड्डा यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास घेऊन पुढे गेले आहेत.  उत्तर प्रदेशसाही त्यांनी पुढे घेऊन जाण्याचे काम केले असल्याचे नड्डा यांनी सांगितले.


केंद्रीय मंत्री आणि अपना दलाच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांनी एनडीएची आघाडी म्हणजे विकास आणि सामाजिक न्यायाचे उत्तम कॉकटेल असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी दिर्घकाळ प्रलंबीत असेलेले मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवले आहेत. तर संजय निषाद यांनी दोन वर्षांपूर्वीच मित्रपक्ष म्हणून ठराव घेतल्याचे सांगितले होते. सबका साथ सबका विकास हा पंतप्रधान मोदींचा संकल्प सर्वापर्यंत न्यायचा आहे. उत्तर प्रदेशमधील आधीचे सरकार हे भेदभावाने काम करत असल्याचा आरोपही यावेळी पटेल यांनी लगावला. 


महत्त्वाच्या बातम्या: