Arvind Kejriwal on Majha Katta : भारतात महत्त्वांच्या पाच राज्यांतील निवडणूका तोंडावर आल्या आहेत. दरम्यान यावेळी पंजाब आणि गोवा या राज्यांमध्ये आम आदमी पार्टी अर्थात आप निवडणूक लढवणार आहे. दरम्यान या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांंनी एबीपीच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात आगामी निवडणूकांबाबत आपली रणनीती सांगताना विविध सर्व्हेंमधून पंजाबचं पारडं जड का आहे? यामागील कारणही सांगितलं आहे.


विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने काही महिन्यांपासून प्रचाराला सुरूवात केली आहे. लोकांच्या घरोघरी जाऊन आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रचार करत असल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब दौऱ्यावर देखील जाऊन आले. दरम्यान आता त्यांनी माझा कट्टावर बोलताना पंजाबमध्ये आप पार्टीचं सरकार येण्यामागे काय नेमकं कारण आहे? हे देखील सांगितलं आहे. ते म्हणाले, ''पंजाबमध्ये अकाली दल, काँग्रेस सरकार करत असलेल्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली असून आता त्यांच्याकडे आम आदमी पार्टीसारखा पर्याय असल्याने ते आम्हाला निवडून देणार आहेत.'' तसंच आम्ही दिल्लीमध्ये अवघ्या पाच वर्षात शाळा, रुग्णालयं अशा विविध सोयीसुविधा केल्या आहेत. या सोयी सरकार मागील 70 वर्षे देखील पुरवू शकले नाहीत, अशी टीका देखील केजरीवाल यांनी केली आहे.  


काय म्हणतोय सर्व्हे?


पंजाबमध्ये नवजोत सिंह सिद्धू (Navjot Sidhu) आणि चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Channi) यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरुन कलह असल्याचे बोललं जात आहे. पंजाबमधील निवडणूका आणि काँग्रेस पक्षातील कलह याची राजकीय चर्चा होत आहे. पंजाबमधील कलहाचा इतर पक्षाला फायदा होईल का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळेच एबीपीने सी वोटरच्या मदतीने सर्व्हे केला आहे. यामध्ये जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.  काँग्रेसमधील वादाचा कुणाला फायदा होईल? असा प्रश्न सी वोटरच्या सर्व्हेमध्ये विचाऱण्यात आला होता. यामध्ये जनतेने धक्कादायक उत्तर दिलं आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्या 50 टक्के लोकांना वाटतेय की, काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा फायदा आम आदमी पार्टीला होईल. तर 22 टक्के लोकांना वाटतेय की, अकाली दलला याचा फायदा होईल. तर 14 टक्के लोकांनी भाजपच्या बाजूने मत दिलेय. 14 टक्के लोकांनी माहित नाही, हा पर्याय निवडला आहे.  


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha