नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटत सापडला आहे. डाळिंबावर पिन बोरर, होल बोरर या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळिंबाच्या बागा संकटात सापडल्या आहेत. त्या बागा वाचविण्यासाठी केंद्र सरकारने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिक व नुकसान भरपाईसाठी मदत करावी अशी मागणी केंद्रीय कृषीमंत्री नरेद्रसिंह तोमर यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकाच्या वतीने खासदार डॉ. विकास महात्मे आणि मोर्फाचे अध्यक्ष कॄषीभूषण अंकुश पडवळे यांनी कृषीमंत्री तोमर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली.
दरम्यान, केंद्रीय कॄषीसचिव संजय अग्रवाल यांना महाराष्ट्रातील डाळिंब फळ पिकावरील आलेल्या मर रोगाच्या समस्येची व शेतकऱ्यांना तांत्रिक काय मदत करता येईल यासाठी तत्काळ शिष्टमंडळ पाठवून पाहणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक मागील पाच वर्षापासून तेलकट डाग व अतिवॄष्टीमुळे अडचणीत असताना त्यात भर म्हणून झाडाला पिन बोरर व होल बोरर या किडीमुळे झाडाची मर मोठया प्रमाणावर वाढली आहे. या समस्येमुळे बागाच्या बागा संपत आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील चाळीस हजार हेक्टर जास्त क्षेत्र पिन व होल बोररमुळे आलेल्या मरीने संपले असून, ऐंशी हजार हेक्टरवरील क्षेत्राला या किडीची लागण झाली आहे. संशोधकांनी केलेल्या अनेक शिफारशींचे औषधे वापरूनही सदर किडीवर नियत्रंण मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मागील तीन वर्षापासून अतिवॄष्टीमुळे डाळिंब उत्पादाकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यात आता या किडीने डाळिंब बागा संपायची परिस्थीती निर्माण झाल्यामुळे शेतकरी मोठया संकटाना सामोरे जात आहे. यासाठी आता राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना यासाठी मदत करणे आवश्यक असल्याचे केद्रीय कॄषीमंत्री नरेद्रसिंग तोमर यांना महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने सांगितले. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे व नुकसानीची तीव्रता बघून कशी मदत करता येईल याबाबत सहानुभुतीपुर्वक विचार केली जाईल असे आश्वासनही कृषीमंत्र्यांनी शिष्ठमंडळाला दिले आहे. कृषीमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात खासदार डॉ. विकास महात्मे, मोर्फाचे अध्यक्ष कॄषीभूषण अंकुश पडवळे, रविंद्रसिह पाल, नविशकुमार विग, राहुल खंन्ना, केदारनाथ आंनद हे सहभागी होते.
कृषीमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतील मुद्दे -
1) डाळिंबावर पिन बोरर आणि होल बोरर ही किड खोडावर छिद्र करून खोडात प्रवेश करून खोडांची आतून चाळन करते, यामुळे झाड तात्काळ सुकुन जाते.
2) सध्या महाराष्टांतील चाळीस हजार हेक्टर क्षेत्र या किडीने संपले असून 80 हजार हेक्टर क्षेत्रावर या किडीची लागण झाली आहे.
3) दुष्काळी भागातील असणारे डाळिंब हे फळ पिकच संपण्याची भिती निर्माण झाली आहे शेतकरी बागांना आर्थिक खर्च करून ही व अनेक उपाय योजना करून ही उपयोग होत नसल्याने हतबल झाला आहे.
4) महाराष्ट्र हे देशातून सर्वाधिक डाळिंब निर्यात करणारे राज्य आहे. यावर्षी उत्पादन व निर्यात घटणार
5) शेतकऱ्यांना योग्य तांत्रिक मदत वेळेत मिळणे गरजेचे आहे. परंतू अदयापही शेतकऱ्यांना कोणाचे योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही.
6) केंद्रीय कॄषीमंत्री नरेद्रसिंग तोमर यांनी डाळिंबवरील संकटाची तत्काळ दखल घेऊन कॄषीसचीव संजय अग्रवाल यांना केंद्रीय पथक पाठविण्याच्या सुचना दिल्या.