उदगीर या मुस्लीम बहुल मतदारसंघावर आर्य समाज, हिंदुत्ववादी विचारांचा मोठा प्रभाव आहे. त्याचबरोबर इथला विजय हा जातीय समीकरणावर आधारित असतो. याचा कायमच प्रत्यय येत राहतो. या मतदारसंघात उमेदवार कोण यापेक्षा जातीय समीकरणे प्रबळ आहेत.
उदगीर हा राखीव मतदारसंघ आहे. जेव्हापासून हा मतदारसंघ राखीव झाला आहे, तेव्हापासून भाजपाने ही जागा स्वत:च्या ताब्यात ठेवली आहे. भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव यांनी मागील दोन्ही वेळी इथून विजय प्राप्त केला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या सीमावर्ती भागातील उदगीर मतदारसंघात उदगीर आणि जळकोट तालुक्यांचा समावेश आहे. आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आलेली ही जागा मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी ताब्यात होती. या मतदारसंघात संघाचे नेटवर्क उत्तम आहे. ज्याचा फायदा भाजपाला मिळत आला आहे.
मागील दोन टर्म भाजपाचे सुधाकर भालेराव इथून निवडून येत आहेत. 2014 मध्ये भाजप अंतर्गत गटबाजीमुळे नाराजी असली तरी मोदी लाटेचा प्रभाव, राष्ट्रवादीची फाटाफूट, काँग्रेसमधील विस्कळीतपणाचा लाभ भालेराव यांना मिळाला. मात्र, यावेळी तो फायदा मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. भाजपातील अनेक गट-तट आहेत, जे आमदाराच्या विरोधात सक्रिय झाले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत त्याचे खुले प्रदर्शनही झाले. राष्ट्रवादीच्या आशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत. मात्र राज्यात राष्ट्रवादीची झालेल्या वाताहतीचा काहीसा परिणाम या मतदारसंघावरही होत आहे. खंबीर नेतृत्वाअभावी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात लढण्याची उमेदच राहिली नाही. गतवेळी अपयशी लढत दिलेल्या संजय बनसोडे यांनी पराभवानंतरही सातत्याने उदगीर-जळकोटशी संपर्क कायम ठेवल्याचा लाभ राष्ट्रवादीला संभवतो.
मुस्लीम, दलित मतदारांचे इथे वर्चस्व असल्याने वंचित बहुजन आघाडीलाही मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, स्वतःच्या ताकदीवर विजय नोंदवू शकेल असा उमेदवार इथे नाही. तरीही इच्छुकांची भाऊगर्दी पाहावयास मिळत आहे.
जातीय समीकरणे -
शहर परिसरात मुस्लीम, लिंगायत, वंजारी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. लिंगायत, मातंग मराठा आणि इतर हे भाजपाच्या मागे जातील. तर मुस्लिम आणि दलित मते यांचे विभाजन हे राष्ट्रवादी आणि वंचितमध्ये होईल. त्याचा थेट फायदा भाजपाला होईल अशी स्थिती आहे.
रोजगाराची परिस्थिती
लातूर-उदगीर हा मुख्य रस्ता असेल किंवा उदगीर इथून कर्नाटक, तेलंगणा राज्य रस्ता, उदगीर-अहमदपूर-नांदेड, उदगीर-जळकोट आणि कोणत्याही शहराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. रस्ते व महामार्ग विकासात खूपच मागासलेला उदगीर मतदारसंघ कृषी आधारित व्यवसायावर चालतात. मात्र त्यांना गती मिळत नाही. रोजगाराच्या शोधात या भागातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांचे लोंढे हे मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगलोरकडे जाताना दिसत आहेत. रस्ते, पाणी, वीज, शैक्षणिक, आरोग्यविषयक सोयी-सुविधा, व्यापार, उदयोग, कारखानदारीच्या अभावाने उदगीर हा लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असूनही अतिशय वाईट अवस्थेत आहे. वाढत्या बेरोजगारीकडे कोणाचेही लक्ष नाही.
युतीत जागा - भाजपा : आमदार सुधाकर भालेराव ( दोन टर्म )
आघाडीत जागा - राष्ट्रवादी काँग्रेस
2014 ची परिस्थिती :
एकूण मतदार - 2,71,610
प्रत्यक्ष मतदान - 1,70,199
सुधाकर भालेराव - 66,687 (भाजप)
संजय बनसोडे - 41, 800 (राष्ट्रवादी काँग्रेस)
राम अदावळे - 15,415 (शिवसेना)
रामकिशन सोनकांबळे - 37,837 (काँग्रेस)