मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार की नाही? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. युतीसंदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहे. मात्र जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याचे अद्याप युती होऊ शकलेली नाही. युती न झाल्यास नारायण राणे आणि छगन भुजबळ यांचा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा आहे.


गेल्या काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत आले आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांनी आपले हुकुमी एक्के लपवून ठेवले आहेत. नारायण राणे आणि छगन भुजबळांचा प्रवेश का लांबणीवर पडलाय? याचं कारणही युतीच आहे.


जागा वाटपाटपाचा तिढा सुटत नसल्याचे दोन्ही पक्षांची स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी राणे आणि भुजबळांना राखून ठेवल्याचं समजत आहे.


नारायण राणेंना भाजपने घेतलं तर शिवसेनेला पटणार नाही. त्यामुळेच भाजपच्या काळात ज्या भुजबळांवर कारवाई झाली, त्यांना शिवसेनेत घेतलं तर भाजपला पटणार नाही, म्हणून दोन्ही पक्षांनी राणे-भुजबळ अस्त्र राखून ठेवलं आहे.



युतीत नारायण राणे आणि छगन भुजबळ पक्षात आल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र युती झाली नाही तर राणे-भुजबळांना घेऊन दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं कळतंय. स्वबळावर राणेंना घेऊन लढल्यास कोकणात किमान चार जागा भाजप जिंकू शकतो, तर भुजबळांसोबत लढल्यास शिवसेनालाही चार जागा जिंकता येऊ शकतात, असा सर्व्हे रिपोर्ट आहे.


गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा आहे. या चर्चेनंतर शिवसैनिकांनी आपली नाराजीही व्यक्त केली होती. तसेच छगन भुजबळांनीही या चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलं होतं. तर नारायण राणे भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहेत, मात्र शिवसेनेचा विरोध लक्षात घेत भाजपने त्यांना होल्डवर ठेवलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपची युती न झाल्यास दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.



संबंधित बातम्या