मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे आपला शेवटचा गड वाचवण्यासाठी कामाला लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा (Shivsena) भगवा फडकत आहे. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामुळे शिवसेनेचा अभेद्य किल्ला अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (BMC Election 2024) काय होणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यासाठी मुंबईतील शिवसेना नगरसेवकांना मंगळवारी मातोश्रीवर बोलवण्यात आले आहे.
विधानसभेच्या धक्क्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागात तयारीला सुरुवात केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांसह नेते, सचिव आणि संघटकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, सुनील राऊत, बाळा नर, सुनील शिंदे, अमोल कीर्तिकर यांच्यासह एकूण 18 जणांची टीम प्रत्येकी दोन विधानसभेतील बारा प्रभागांचा आढावा घेणार आहे. पुढील आठवडाभरात हा अहवाल तयार करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवला जाईल. अहवालाच्या आधारावर महापालिकेच्या जागांची वर्गवारी करुन ठाकरे गटाकडून निवडणुकीचा पुढचा आराखडा निश्चित केला जाईल.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आजची बैठक आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकासुद्धा आता राज्य सरकारला लावाव्या लागणार आहेत. त्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या निरीक्षकांवर नेमकी काय जबाबदारी असेल, याबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी सोबत न जाता एकट्याने लढायचं का ? याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
ठाकरेंच्या कोणत्या नेत्याकडे कोणत्या विभागाची जबाबदारी?
विनायक राऊत - कुर्ला, विक्रोळी
अनिल परब - मलबार हिल, कुलाबा
मिलिंद नार्वेकर - माहिम, शिवडी
वरुण सरदेसाई - कलिना, वांद्रे पश्चिम
विश्वनाथ नेरुरकर - विलेपार्ले, चांदिवली
रवींद्र मिर्लेकर - वांद्रे पूर्व, वरळी
अमोल कीर्तीकर - दहिसर, मागठाणे
दत्ता दळवी - जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी
सुनील राऊत- वडाळा, भायखळा
सुनील शिंदे- मुलुंड, भांडुप पश्चिम
बाळा नर - चारकोप, मालाड पश्चिम
बबनराव थोरात - अंधेरी पूर्व,अंधेरी पश्चिम
शैलेश परब - बोरिवली, कांदिवली पूर्व
उद्धव कदम -धारावी सायन कोळीवाडा
विलास पोतनीस- वर्सोवा, गोरेगाव
सुहास वाडकर - घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व
शैलेश फणसे - मानखुर्द शिवाजीनगर, मुंबादेवी
संजय घाडी - अणुशक्ती नगर,चेंबूर
आणखी वाचा
एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत महत्त्वाचे अपडेट, पांढऱ्या पेशींमुळे अशक्तपणा, डॉक्टर म्हणाले...