मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीने दमदार यश मिळवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजपवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला. सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते, ते दाखवून दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यामध्ये महाविकास आघाडीने मिळवलेल्या दमदार यशानंतर शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली. 


विशाल पाटील आमच्यातच येतील


दरम्यान, सांगली लोकसभेला विशाल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला. मात्र, सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला. त्या जागेवरती दावा कायम ठेवण्यात आला होता. मात्र ठाकरेंनी सुद्धा माघार न घेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली होती. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सांगलीच्या निकालवरून विचारण्यात आला असता त्यांनी सांगितले की, सांगली बाबत आमचा निकाल चुकला असून पण विशाल पाटील आमच्यातच येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


पंतप्रधानपदाचे दावेदार नसल्याचे स्पष्ट


दरम्यान, मस्तवालपणा दाखवणाऱ्यांचं काय होतं, हे जनतेने दाखवून दिलं आहे असं त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल असलं, तरी भाजपला एकहाती बहुमत मात्र मिळालेलं नाही. त्यामुळे दोन्हीकडून  चंद्रबाबू नायडू आणि नितीशकुमार यांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर एनडीएची उद्या बैठक बोलावण्यात आली आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीची सुद्धा बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला आपण जाणार आहात का? असे विचारले असता त्यांनी आधी संजय राऊत आणि मग काही खासदार जाणार असल्याचे सांगितले. त्यांच्यानंतर मी उद्या (5जून) दुपारी दिल्लीला जाणार असल्याचे म्हणाले. दरम्यान, आपण पंतप्रधानपदाचे दावेदार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते कोण असेल याबाबतचा निर्णय उद्या घेतला जाईल, असेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या