पुणे : देशातील लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे अपेडट हाती येत असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. त्यातच, राज्याचे लक्ष लागेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज लढत होती. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जरी लढत असली तर ही लढत थेट शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच झाल्याचं पाहायला मिळालं. येथील निवडणुकीत बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला नाकारलं असून सुप्रिया सुळेंनी बाजी मारली आहे. त्यामुळे, दोन दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे लागलेले बॅनर काढण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


लोकसभा निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली. मात्र, उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांचे बॅनर निकलापूर्वीच लावण्यास सुरुवात केली होती. खरंतर यंदा अतिशय चुरशीच्या लढती झाल्याने कोणीचं ठामपणे निकाल सांगू शकत नाही, अशी परिस्थिती होती. यातच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. इथून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात काट्याची लढत झाली. त्यानंतर, इंदापूर परिसरात निकालाच्या तीन दिवस आधीच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. इंदापूर शहरातील ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मयूर शिंदे यांनी हे बॅनर लावले होते. मात्र, आता सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर हे बॅनर उतरवण्यात आले आहेत.  


बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे खात्री होताच इंदापूरमधील सुनेत्रा पवार यांचे बॅनर उतरवण्यात आले आहेत.  अति उत्साही कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांचे विजयाचे लावलेले बॅनर अखेर पराभवाची खात्री होताच खाली उतरवले. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर शहरात काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावले होते. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुनेत्रा पवार व शरद पवार गटाच्याही कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळे यांचे देखील बॅनर विजयी झालेल्या शुभेच्छा देऊन झळकवण्यात आले होते. यातील सुनेत्रा पवार यांचे बॅनर उतरवण्यात आले आहेत. अखेर इंदापुरातील अति उत्साही पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनीसुप्रिया सुळे यांच्या विजयाची खात्री होताच सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे लावलेले बॅनर उतरवले आहेत. 


नणंद-भावजयच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेय. बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार साहेबांसोबत इमोशनली कनेक्टेड आहे तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे . प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता.   सुप्रिया सुळेंनी 16 व्या फेरी अखेर मोठी मुंसडी मारल्याचं दिसून आलं. सुप्रिया सुळेंना 1 लाख आठ हजार 490 चा लीड मिळाल्याचे दिसून आले. जवळपास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 


मतदान 59.50 टक्के


बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 59.50 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानात काहीशी घट झाली आहे. 2019 मध्ये बारामतीत 61.70 टक्के मतदान झाले होते. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढत ही अटीतटीची आहे. त्यामुळे मतदानातील ही साधारण 2 टक्क्यांची घटही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.  बारामती लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामधील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास खडकवासला आणि पुरंदरमध्ये मतदानाची सर्वाधिक कमी टक्केवारी नोंदवली गेली आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्याने या भागातून सुनेत्रा पवार यांना मोठी लीड मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, खडकवासला मतदारसंघात अवघे 51.55 टक्के मतदान झाले आहे. ही महायुतीच्यादृष्टीने चिंताजनक बाब मानली जात आहे. याशिवाय, सुरुवातीच्या काळात अजित पवार यांना कडवा प्रतिकार करणाऱ्या विजय शिवतारे यांच्या पुरंदरमध्ये अवघे 53.96 टक्के मतदान झाले आहे.