मुंबई: उद्धव ठाकरे यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारलेले लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांनी काहीवेळापूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. 'माझ्या प्रिय, शिवडी विधानसभेतील निष्ठावंत शिवसैनिकांनो, मला तुमच्याशी बोलायचं आहे!', असा मजकूर या पोस्टरवर लिहला आहे. आज संध्याकाळी लालबाग मार्केटमध्ये सुधीर साळवी हे आपल्या समर्थकांशी संवाद साधतील. यावेळी ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


सुधीर साळवी यांचे हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टरवर जो मजकूर आहे, त्यामध्ये 'निष्ठावंत' हा शब्द लाल शब्दांत ठळक अक्षरात लिहला आहे. केवळ हाच शब्द इतक्या ठळकपणे लिहायचे कारण काय, यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महायुतीच्या सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार शिवडी विधानसभेची जागा ही शिंदे गटाकडे आहे. मात्र, शिंदे गटानेही अद्याप शिवडीतील उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे सुधीर साळवी हे आजच्या मेळाव्यात काही वेगळा निर्णय घेणार का, हे पाहावे लागेल.


एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वारसा घेऊन पुढे जात आहोत, असे वारंवार सांगितले आहे. आपणच खरे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचाही दावा त्यांनी अनेकदा केला आहे. त्यामुळेच सुधीर साळवी यांच्या पोस्टरवरील 'निष्ठावंत' हा शब्द चर्चेचा विषय ठरत आहे. सुधीर साळवी हे गेल्या वर्षभरापासून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. मात्र, ठाकरे गटाने शिवडीतून अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे सुधीर साळवी यांचे समर्थक प्रचंड संतापले होते. या समर्थकांनी कालच लालबाग मार्केटमधील शिवसेना शाखेजवळ गर्दी करत सुधीर साळवी यांना विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे आता सुधीर साळवी हे मशाल आणि धनुष्यबाण यापैकी कशाची निवड करणार, याचा फैसला आज संध्याकाळी लालबागमध्ये होईल. 


सुधीर साळवी नाराज नाहीत: संजय राऊत


सुधीर साळवी हे काय शिवसेनेपेक्षा वेगळी पर्सनॅलिटी नाहीत. ते आमचे प्रमुख सहकारी आणि पदाधिकारी आहेत. त्या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुखांनी विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी दिलेली आहे. एखादा मतदारसंघात एकापेक्षा जास्त नेते इच्छूक असतात. मला वाटत नाहीत, सुधीर साळवी नाराज आहेत. स्थानिक पातळीवर नवा चेहरा हवा आहे, अशी कोणतीही मागणी आमच्यापर्यंत आलेली नाही. सगळा विचार करुनच अजय चौधरी यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.


आणखी वाचा


मला तुमच्याशी बोलायचं आहे! सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण; ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का बसणार?