Solapur Municipal Corporation Elections 2022 : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यात 11 महानगरपालिकांची मुदत संपली आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation) मुद्यावरुन या निवडणुका काही काळ लांबल्या मात्र सर्वोच्च न्यायलयाने (Supreme Court) यासंदर्भात निर्णय देत निवडणुकांचा (Election 2022) मार्ग मोकळा केला. तसेच ज्या ठिकाणी पाऊस जास्त नसतो तिथे स्थानिक स्वराज्य निवडणूक घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या. ज्या जिल्ह्यात पाऊस कमी असतो तिथे ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत वाट बघण्याची गरज नाही. स्थानिक स्थितीचा आढावा घेऊन आयोगाने कार्यक्रम ठरवावा अशा सुचना सर्वोच्च न्यायलयाने केल्या होत्या. त्यानुसार सोलापूर महापालिकेसाठी (Solapur Municipal Corporation) आयोगाने तयारी सुरु केलेली दिसतेय. सोलापूर (Solapur) महानगरपालिकेची मुदत संपल्याने प्रशासनाच्या हाती कारभार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच अंतिम प्रभाग रचना जाहीर झालीय. तर आरक्षण देखील सोडतीद्वारे जाहीर करण्यात आले आहे. 


कामगारांचे शहर अशी ओळख असलेल्या सोलापूरला प्राचीन इतिहास आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या शहराने तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगलेलं आहे. स्वातंत्र्यापूर्वीच 1930 मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. या घटनेमुळे मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसन सारडा यांना ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून हे शहर हुतात्म्यांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. शहराला जसा सामाजिक इतिहास आहे तसा राजकीय इतिहास देखील लाभलाय.  


1 ऑगस्ट 1852 रोजी सोलापूर नगरपालिकेची स्थापना झाली. पुढे याच सोलापूर नगरपालिकेचे 1 मे 1964 मध्ये महापालिकेत रूपांतर झाले. शेवटचे नगराध्यक्ष असलेले पारसमल जोशी हेच पहिले महापौर झाले. जवळपास 57 वर्षांच्या इतिहासात सोलापूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून 37 जणांना मान मिळाला. शेवटच्या महापौर या भाजपच्या श्रीकांचना यन्नम होत्या. 8 मार्च 2022 रोजी महापालिकेची मुदत संपल्याने येत्या काळात या ठिकाणी निवडणुका अपेक्षित आहेत. 


सोलापूर महानगरपालिकेवर अनेक वर्ष काँग्रेसने (Congress) एक हाती आपली सत्ता गाजवली आहे. प्रशासकीय कारकीर्द, 1985 साली पुलोदचा अपवाद वगळता 2017 पर्यंत काँग्रेसची सत्ता या महानगरपालिकेत राहिली आहे. मात्र 2017 साली सोलापूर महानगरपालिकेत सत्ता बदल झाला. पहिल्यांदाच सोलापूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आली. भाजपने 2017 ते 2022 पूर्ण पाच वर्ष सत्ता राखली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप परत सत्ता राखणार की, काँगेस आपला गड परत मिळवणार हे पाहावे लागणार आहे. यामध्ये विशेषत: काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आदी नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत.


काँग्रेस-भाजप या पारंपारिक प्रतिस्पर्धींना बाजूला सारत राष्ट्रवादी कमाल करणार का?


सोलापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील संबंध सर्वश्रृत आहेत. त्यामुळे सोलापूर शहरात राष्ट्रवादीने (NCP) आणि ग्रामीण भागात काँग्रेसने हस्तक्षेप करायचा नाही असा जणू अलिखित करार होता असे बोलले जाते. सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादीने कधीच हस्तक्षेप केला नाही. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सोलापूरात देखील राष्ट्रवादी पाय रोवताना दिसतेय. काँग्रेस, भाजप, शिवसेना अशा विविध पक्षातील स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. यामध्ये काँग्रेसच्या काळात महापौर राहिलेले देखील नेते मंडळीचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कामगिरीकडे देखील विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. 


सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तर काही दिवसापूर्वी सोलापुरात बोलताना यंदाच्या निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेवर महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल असे विधान केले होते. माजी महापौर महेश कोठे यांच्याकडे महापालिकेच्या निवडणुकांची धुरा सोपविण्यात आली आहे. सोबतच एमआयएमचे नगरसेवक राहिलेले तौफिक शेख, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते राहिलेले आनंद चंदनशिवे, माजी आमदार दिलीप माने हे देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप या पारंपारिक प्रतिस्पर्धींना बाजूला सारत राष्ट्रवादी कमाल करणार काय हे देखील पाहावं लागणार आहे.