राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून स्वतंत्र मुख्यालय करण्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी असलेला श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ. माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक, गोविंदराव आदिक, जयंत ससाणे आणि भानुदास मुरकुटे यांच्याच भोवती तालुक्याचं राजकारण फिरत राहिलंय.

भानुदास मुरकुटे यांच्या ताब्यातील अशोक सहकारी साखर कारखाना वगळता कोणत्याही नेत्याकडे मोठी संस्था नाही. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून अनेक संस्थावर ससाणे समर्थकांची पकड असली तरी, यावेळच्या निवडणुकीत स्व. गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक यांनी ससाणे गटाचा पराभव करीत श्रीरामपूरचं नगराध्यक्ष पद मिळवलं आहे. याचं निवडणुकीनंतरच तालुक्यातील सत्तासंघर्ष तीव्र झाला.

लोकसभा निवडणुकीत स्थानिक आमदार भाऊसाहेब कांबळे उमेदवार असताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांना २१ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार कोण यावर निवडणूक रंजक होणार आहे.

श्रीरामपूर तालुका हा ऊस आणि कांदा उत्पादकांचा तालुका. जिल्हा मुख्यालयास लागणाऱ्या सर्व कार्यालये आणि त्यांच्या इमारती तालुक्यात आहेत. श्रीरामपूरला स्वतंत्र आर टी ओ आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने हवी असणारी उत्तम वाहतूक व्यवस्था तसेच  रेल्वेची उपलब्धता आहे. यामुळेच अहमदनगर जिल्हयाचं विभाजन होऊन श्रीरामपूर हा जिल्हा व्हावा अशी मागणी सातत्याने पुढे येत असते.

अपवाद वगळता जिल्हयाचं राजकारण हे आदिक, मुरकुटे आणि ससाणे या गटांभोवतीच फिरत असतं. दिवंगत आमदार आणि साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष जयंतराव ससाणे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना राजकारणातील राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखलं जायचं. जयंत ससाणे हे गोविंदराव आदिक आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या तालमीत वाढलेले. 1999 साली राष्ट्रवादी स्थापन झाली आणि जयंत ससाणे यांनी राष्ट्रवादीचे त्यावेळचे उमेद्वार भानुदास मुरकुटे यांचा अवघ्या 500 मतांनी पराभव केला. त्यानंतर ससाणे 2004 सालीही पुन्हा आमदार झाले. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर, श्रीरामपूर अनुसुचित जातीसाठी राखीव झालं आणि ससाणे आणि विखे समर्थक म्हणून ओळख असणारे नगरसेवक भाऊसाहेब कांबळे हे सलग दोन वेळा आमदार झाले.

२०१४ साली मिळलेली मते

भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)    ५७११८
भाऊसाहेब वाकचौरे (भाजप)   ४५६३४



२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली खरी पण नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यानं त्याचा परिणाम शिर्डी लोकसभा मतदारसंघात दिसून आला. विखे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आमदार कांबळेनी विखेंचा हात सोडत बाळासाहेब थोरात यांना साथ दिली, आणि लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे यांना पराभव पत्करावा लागला. जयंत ससाणे यांच्या निधनानंतर राजकीय गणित बदलली आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेस ऐवजी शिर्डी लोकसभेत कांबळे यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उघड प्रचार केला. बाळासाहेब थोरातांनी जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे याला काँग्रेस जिल्हाध्यक्ष केलं. मात्र आठच दिवसात विखेंच्या सांगण्यावरून करण ससाणे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत, राधाकृष्ण विखे पाटलांनी ससाणेंना जवळ करण्यात यश मिळवलं.

काय होईल यावेळी 


लोकसभा निवडणुकीनंतर श्रीरामपूर विधानसभा मतदार संघावर विखे पाटलांनी पुन्हा एकदा लक्ष केद्रिंत केल आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र  राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ सोडल्याने कांबळे यांना भानुदास मुरकुटे आणि आदिक गटानं साथ दिली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र चेतन लोखंडे या मतदार संघातून इच्छुक आहेत. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या या मतदार संघात काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे आणि त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांनी सभा घेतल्याने, शिवसेनेच्या वतीने प्रचारास सुरवात झालीय.



वंचित बहुजन आघाडीची ताकदही या मतदारसंघात मोठी आहे. वंचितने जिल्ह्यातील सर्व 12 जागा लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

मतदार संघातील महत्वाचे प्रश्न 

शेतीसाठी पाणी..
अहमदनगर जिल्हयाच विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा..
वाढती गुन्हेगारी..
श्रीरामपूर - नेवासा जोडणारा रस्ता चौपदरीकरण