मुंबई : "मी काँग्रेसमध्येच कायम राहणार असून, शिवसेनेत जाण्याचा कोणताही इरादा नाही. मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती," असं सांगत विधानपरिषद आमदार अनंत गाडगीळ यांनी शिवसेना प्रवेशाचं वृत्त फेटाळलं.


काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी (23 ऑगस्ट) 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर माध्यमांमध्ये त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या. अनंत गाडगीळ यांची विधानपरिषदेची मुदत पुढच्या वर्षी संपत असल्यामुळे आतापासूनच अनंत गाडगीळ शिवसेना प्रवेशाची मोर्चेबांधणी करत असल्याचं म्हटलं जात होतं.

मात्र स्वत: अनंत गाडगीळ यांनी काँग्रेसमध्येच कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांना पत्रिका देण्याची राहिली होती. त्यासाठी मी काल मातोश्रीवर त्यांची भेट घेतली. परंतु माध्यमांमध्ये मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त पसरलं. मात्र मी काँग्रेसमध्येच राहणात असून शिवसेनेत जाण्याचा कोणताही इरादा नाही."

कोण आहेत अनंत गाडगीळ?
- गांधी घराण्याचे निकटवर्ती म्हणून अनंत गाडगीळ कुटुंबाची ओळख आहे.
- अनंत गाडगीळ हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव गाडगीळ यांचे पुत्र आहेत.
- काँग्रेसने अनंत गाडगीळ यांची 2004 मध्ये राष्ट्रीय प्रवक्ता पदावर नियुक्ती केली.
- यानंतर 2014 मध्ये त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं.
- पण अनंत गाडगीळ हे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.
- काँग्रेसचे काही नेते आणि प्रवक्ते त्यांना डावलत असल्याचा आरोप आहे.
- शिवाय पुढच्या वर्षी त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांनी शिवसेनेशी जवळीक साधल्याचं बोललं जातं.