परभणी : राष्ट्रवादीच्या प्रत्येक सभेत यापुढे पक्षाच्या झेंड्यासह भगवा झेंडा फडकणार आहे. या भगव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरीमध्ये राष्ट्रवादीच्या 'शिवस्वराज्य' यात्रेत अजित पवारांनी ही घोषणा केली.
राष्ट्रवादीच्या सभांमध्ये आता पक्षाचा आणि भगवा झेंडा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुणाजी जहागिरी नाही. शिवाजी महाराज कुणाच्या मालकीचे नाहीत, महाराज सगळ्यांचे आहेत. त्यानुसार परभणीत शिवस्वराज्य यात्रेदरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे लावण्यात आले होते.
निवडणुका जवळ आल्या म्हणून कारवाई सुरु
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. यावरही अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली. निवडणुका जवळ आल्या की असे आदेश, नोटीस निघतात. मी राज्य सहकारी बँकेचा संचालक होतो, मात्र निर्णय माझे नव्हते. आम्ही कायद्यात राहूनच काम केलं. आम्ही न्यायालयाचा आदर करतो, मात्र गुन्हा दाखल करण्याची गरज नसताना हे झालं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.
भाजपकडून शेतकऱ्यांची फसवणूक
भाजपने महाराष्ट्राला फसवलं आहे. शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. ती कधी मिळणार याची माहिती नाही. आमचं सरकार आलं तर चार महिन्यात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करु. शब्द पाळला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. साले म्हणणाऱ्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.
या सरकारच्या कार्यकाळात सामान्य माणसांचं उत्पन्न कमी झालं. मात्र अदानी, अंबानी सारख्या उद्योगपतींचं यांचं उत्पन्न दुपटीने वाढलं, असंही अजित पवार म्हणाले.