बारामती : शरद पवार हे राजकारणातील सर्वात अनुभवी खिलाडी... पवारांनी आजवर केलेलं प्रत्येक भाकित खरं ठरल्याचे अनेक दाखले दिले जातात. पवारांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत आगामी सरकारबाबत सर्वात मोठं भाकित केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं, तरी या सरकारची अवस्था वाजपेयींच्या 1996 च्या सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं 13 किंवा 15 दिवस टिकेल, असा दावा शरद पवारांनी केला.  भाजप विरोधातील सर्व पक्षांची मोट बांधण्याचं काम सुरु असून त्याला 21 मे रोजी मूर्त रुप येईल, असंही पवारांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं आहे.


इतकंच नाही, तर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी दुसरा नातू अर्थात रोहित पवार यांचे लाड पुरवण्याचेही संकेत दिले आहेत. शरद पवारांनी नातवासह पहिल्यांदाच एकत्रित मुलाखत दिली आहे.

आमच्या घरात सगळे निवडणुकीत सहभागी होतात. रोहित शिक्षण, शेतकरी या प्रश्नाबाबत लक्ष देतात. आमच्या कुटुंबातील सगळे निवडणुकीत जबाबदारी समजून काम करतात. निवडणूक संपली की आपलं काम करतात. रोहित चांगली इंडस्ट्री चालवतो, शेतकऱ्यांशी त्याचा संपर्क आहे, अशा शब्दात पवारांनी नातवाचं कौतुक केलं.

रोहित पवारांच्या उमेदवारीबाबत अजून पक्षाने विचार केला नाही, पक्ष निर्णय घेईल. मावळमध्ये आम्ही प्रभाव येत होता, तेव्हा त्या भागातील लोकांनी पार्थचं नाव सुचवलं, म्हणून निर्णय झाला. लोक सांगतात रोहितला उमेदवारी द्या, तो लक्ष घालतो, कर्जत जामखेडमध्ये पण आमचा सतत पराभव झालेला आहे. तो मतदारसंघ जिंकायला राष्ट्रवादीला जो उपयुक्त उमेदवार वाटतो, तो उमेदवार देऊ, असं पवार म्हणाले.
एनडीएला बहुमत मिळालं नाही तर 'हे' तिघे असतील पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार : शरद पवार

दुष्काळ दौरा ही विधानसभा निवडणुकांची तयारी नसल्याचं शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात फिरताना जाणवलं की लोकांना दुष्काळाला तोंड द्यावं लागत आहे, पिण्याचं पाणी, पशुधन यासारख्या समस्यांना जनतेला तोंड द्यावं लागत आहे, याकडे पवारांनी लक्ष वेधलं.



1972, 1978 साली मी दुष्काळ पाहिला. 72 मध्ये गृहराज्यमंत्री, तर 78 मध्ये मुख्यमंत्री होतो, तेव्हा पीक गेलं होतं, पाणी होतं. आता लोकांना पाणी हवं आहे. यावेळी दुष्काळाची तीव्रता अधिक आहे, असंही शरद पवारांना वाटतं. धान्याची किंमत वाढणार नाही, तेल आणि डाळींची किंमत वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाजही पवारांनी वर्तवला.
मतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या 'त्या' वक्तव्यावर शरद पवार म्हणतात...

राज्यात सत्ताबद्दल होणार, असं भाकितही पवारांनी वर्तवलं. भाजप-शिवसेनेच्या हातात सत्ता राहणार नाही. सरकारविरोधात संतप्त जनमत असल्याचं निरीक्षण पवारांनी बोलून दाखवलं. विधानसभेला युती होणार, त्यांना पर्याय नाही, असं सांगतानाच 'एकाला नवरा मिळत नाही, एकाला बायको मिळत नाही' अशी गावाकडची म्हणही पवारांनी बोलून दाखवली.

भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत वर्तवलेल्या अंदाजाचा शरद पवारांनी समाचार घेतला. भाजपचं गणित चुकतंय, भाजपला 500 जागा मिळतील, असंही पवार उपाहासाने म्हणाले. आठ महिन्यांपूर्वी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड ही राज्यं हातातून गेली, यातून लोकांचा ट्रेंड काय आहे, ते कळतं. असं असताना हे 500-300 सांगतात, याला अर्थ नसल्याचंही पवार म्हणाले.

यंदाचं सरकार त्रिशंकू नसेल, असा अंदाज शरद पवारांनी वर्तवला. भाजपच्या हातात सत्ता जाणार नाही. बाकीचे पक्ष एकत्र बसून स्थिर सरकार देतील. लोक शहाणे आहेत, राज्यकर्ते शहाणे आहेत. अटलजींसारखे नेते असताना आणि कुणाचं नेतृत्व न देता आम्ही 2004 ला सरकार स्थापन केलं. आम्ही मनमोहन सिंग यांना प्रोजेक्ट केलं नव्हतं, 10 वर्ष कारभार केला, आताही आम्ही वेगळे लढलो, तरी एकत्र बसून मतमोजणीआधी आम्ही दिल्लीत बसून स्थिर सरकार देऊ, अशी खात्रीही पवारांनी व्यक्त केली.
बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल : पवार

'यूपीए' म्हणा किंवा काही म्हणा, 21 तारखेला आम्ही समविचारी पक्षांचे प्रमुख एकत्र ही प्रक्रिया सुरु करायला बैठक घेत आहोत. सगळे पक्ष एकत्र बसून एक पर्याय देण्याचा विचार करतील. पुढील पाच वर्ष देशाला स्थिर सरकार देण्याची काळजी घेतील. एकत्रीकरण करायला हातभार लावण्याची  माझी जबाबदारी माझ्यावर आहे, असं पवारांनी सांगितलं.

सर्व राजकीय पक्ष एकत्र पर्याय देण्याच्या मताचे आहेत. त्यामुळे घोडेबाजार होणार नाही. आम्ही नावांची चर्चा करत नाही, एकत्र बसू, सगळ्यांमध्ये ज्या नावाची एकवाक्यता होईल त्याला सगळे कशाचीही अपेक्षा न करता मदत करु, अशी ग्वाही पवारांनी दिली.

राष्ट्रपती भाजपला मुदतीत संसदेमध्ये बहुमत सिद्ध करण्यास सांगतील. ते बहुमत सिद्ध करण्याची ताकद भाजपमध्ये नसणार. त्यामुळे अटलजी 13 दिवसाचे प्रधानमंत्री झाले, तसे राष्ट्रपतींच्या मनात कोण असेल तर तो 13 दिवस किंवा 15 दिवसाचा कोणी पंतप्रधान असेल, असंही शरद पवार म्हणाले.

मतदार भाजपच्या हातात देशाचा कारभार देणार नाहीत. राजीव गांधी हयात नाहीत. त्यांच्याबाबत केलेलं वक्तव्य लोकांना आवडत नाही, असंही पवार म्हणाले.

राजकीय नेत्यांविषयी पवार काय म्हणाले?

मायावती - बसपच्या सर्वेसर्वा मायावती एनडीएमध्ये जाणार नाहीत, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

जगन रेड्डी - रेड्डींशी बोललो नाही, त्यांचं मत माहीत नाही. आंध्रमध्ये आमच्याबरोबर चंद्राबाबू नायडू आहेत, ते एकमेकांचे विरोधक आहेत. त्यामुळे पुढे काय होईल सांगता येत नाही.

प्रकाशसिंह बादल - माझे आणि बादल यांचे कौटुंबिक संबंध आहेत, ते पुढेही राहतील. पण बादल एनडीएमध्येच राहतील. ही त्यांची भूमिका आहे. राजकीय मत ते प्रामाणिक आहे

स्टॅलिन आणि चंद्रशेखर राव - माझं चंद्रशेखर राव यांच्याशी बोलणं झालं नाही. ज्याअर्थी ते स्टॅलिन यांना भेटले, म्हणजे ते भाजप विरोधी आहेत. याचा अर्थ चंद्रशेखर राव भाजपविरोधी जाण्याच्या भूमिकेत आहे असं वाटत

प्रणव मुखर्जी - मुखर्जी कर्तृत्ववान आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे, पण ते याला तयार आहेत, इतरपक्ष तयार आहेत का माहीत नाही