मुंबई : जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या विस्फोटक मुलाखतीत पवारांनी हा दावा केला. त्यामुळे शरद पवारांना बारामतीचा गड गमावण्याची धास्ती वाटते का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

'काही जणांनी ईव्हीएममधील चीपमध्ये छेडछाड होऊ शकते, अशी माहिती आपल्याला दिली. गुजरात, मध्य प्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडल्याचं वाचनात आलं. मात्र माझ्याकडे याबाबत खात्रीलायक माहिती नाही' असं पवारांनी सांगितलं.



ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, तेही बारामतीची जागा जिंकण्याचं धाडसाने सांगतात, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नियोजन केलं आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात असल्याचं पवारांनी बोलून दाखवलं.



दुर्दैवाने निवडणूक आयोगाबद्दल सध्या येणाऱ्या बातम्या चांगल्या नाहीत. त्यामुळे असं काही घडलं तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, अशी भीती व्यक्त करतानाच पवारांनी निवडणूक यंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहायला हवा, असं मत व्यक्त केलं. शरद पवारांच्या शंकेत काही तथ्य आहे का? किंवा पवारांना बारामतीची जागा गमवण्याची भीती सतावत आहे का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

बारामतीमधून शरद पवारांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. सुप्रिया सुळे सलग दुसऱ्यांदा खासदारपदी आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने रासप आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल यांना तिकीट दिलं आहे. कांचन कुल पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात आहेत.