मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) सातव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असताना सर्वांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी विश्वासू नेत्याची निवड केली आहे. पी.सी. चाको यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून संधी देण्यात आलीय तर पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवपदी राजीव झा यांना संधी देण्यात आली आहे. 


शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी शरद पवारांनी पक्षात बदल केले आहेत. पीसी चाको यांना राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. तर, राष्ट्रीय महासचिव पदी राजीव झा यांना संधी देण्यात आली आहे. 




कोण आहेत पी.सी. चाको?


पी.सी. चाको केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार राहिले आहेत.  पी.सी. चाको यांनी 10 मार्च 2021 काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला होता. युवक काँग्रेसचे केरळचे अध्यक्ष म्हणून त्यांनी  काम केलं आहे. काँग्रेस पक्षात त्यांनी विविध पदांवर काम केलं होतं. 2021 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. केरळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील आहेत.  


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी पक्षानं लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रात 10 जागा लढवल्या आहेत. तर, लक्षद्वीपमध्ये आणि हरियाणात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवार दिले आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत  शरद पवारांच्या पक्षानं सातारा, बारामती, शिरुर, माढा, बीड, वर्धा, रावेर, दिंडोरी, भिवंडी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 


साताऱ्यातून शशिकांत शिंदे, बारामतीतून सुप्रिया सुळे,  शिरुरमधून अमोल कोल्हे, माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील, बीडमध्ये बजरंग सोनवणे, वर्धा मतदारसंघात अमर काळे, रावेरमध्ये श्रीराम पाटील, भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रे, अहमदनगरमध्ये निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात आहेत. लक्षद्वीपमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. 


आज इंडिया आघाडीची बैठक


लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असतानाच देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत होत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणूक निकालाच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मित्रपक्षांची काय भूमिका असणार हे देखील ठरवलं जाऊ शकतं. 


संबंधित बातम्या :


निकालाआधी धाकधूक वाटत नाही, उत्सुकता कशाला मी विजयी होणार, कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली; नारायण राणेंना कॉन्फिडन्स


नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, काँग्रेस नेते संदीप गुळवेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, लगेच उमेदवारीही घोषित