नाशिक : स्वाईन फ्लूमध्ये (Swine Flu) नाशिककरांची चिंता वाढली आहे. नाशिकमध्ये (Nashik News) स्वाईन फ्लूमुळे दोघांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये शहरातील 50 वर्षीय पुरूष तर दिंडोरीतील (Dindori) 42 वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामुळे नाशिकमधील स्वाईन फ्लू बळींची संख्या आठवर गेली असून आतापर्यंत शहरातील 28 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. नाशिक शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने महापालिका (Nashik NMC) प्रशासन खडबडून जागी झाली आहे.
नाशकात स्वाईन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू
गेल्याच आठवड्यात नाशिकमधील जेलरोड भागातील 58 वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूनंतर रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दिंडोरीतील 42 वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाल्याने नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचे निधन झाले.
आतापर्यंत आठ जण दगावले
दरम्यान, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात स्वाईन फ्लूचे 23 बाधित रुग्ण आढळून आले होते. एप्रिलमध्ये जेलरोड येथील 59 वर्षीय डॉक्टरचा या आजारामुळे मृत्यू झाल्याने या आजाराचे गांभीर्य वाढले. त्यानंतर मे महिन्यात सिन्नर मधील दातली गाव येथील एका 63 वर्षीय महिला, मालेगाव येथील 65 वर्षीय व्यक्ती आणि 29 वर्षीय महिला, निफाड येथील 68 वर्षीय महिला तर कोपरगाव येथील 65 वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. आता नाशिकमधील स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे. यामुळे मनपा प्रशासन अलर्ट मोडवर आली असून इतर स्वाईन फ्लूच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
नेमका कशामुळे होतो स्वाईन फ्लू?
स्वाईन फ्लू, ज्याला स्वाईन इन्फ्लूएन्झा असेही म्हणतात, त्याचा परिणाम डुकरांमध्ये तीव्र श्वसन रोग झाला, जो नंतर मानवांमध्ये फ्लूचा H1N1 प्रकार, ए इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये विकसित झाला. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो. जेव्हा एखादी व्यक्ती विषाणूने संक्रमित झालेल्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करते किंवा संपर्क करते किंवा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक, तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो. स्वाईन फ्लू हा आजाराच्या पहिल्या पाच दिवसात संसर्गजन्य असतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आणखी वाचा