Shahajibapu Patil: विधानसभा निवडणुकीत लागलेल्या धक्कादायक निकालात सांगोल्याचे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर शहाजीबापू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. काल मुंबई येथून परत येताच त्यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत विचार विनिमय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीला इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याने याचे रूपांतर जाहीर सभेत झाले. पराभवानंतर शहाजीबापू काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. 




पराभव काय पहिल्यांदा होत आहे का? असा सवाल कार्यकर्त्यांना करून मी यामुळे खचायला काय भिताड किंवा पूल आहे का? असे सांगत शहाजीबापू यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवला. उद्धव ठाकरे आणि भोंगा संजय राऊत इथे काय त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नाही, तर मला पाडायला आले होते असा घणाघात देखील शहाजीबापू पाटील यांनी यावेळी केला. मी भाषणात महायुतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळणार म्हणून सांगत होतो आणि संजय राऊत आम्ही सत्तेत येणार अशी बडबड करीत होते. संजय राऊत कुणाकुणाला तुरुंगात टाकायचं याची यादी करून वाट बघत होते. तू तुरुंगात जाऊन आला म्हणून काय सगळं महाराष्ट्र तुरुंगात गेला पाहिजे म्हणतोय, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. 


संजय राऊत आधी आम्हाला शिव्या देतात अन् मग...


खोटे बोलणारे थोबाड असलेल्या या संजय राऊतांचे महाराष्ट्रातील जनता कधी ऐकणार नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि शहाजीबापूला शिव्या दिल्या शिवाय संजय राऊतांना अन्न गोड लागत नाही. त्यामुळे त्यांना संध्याकाळी भाकरी खायची झाल्यास, एका खोलीत स्वत:ला बंद करून आधी आम्हाला शिव्या देतात, मग बायकोला सांगतो आता भाकरी दे...अशा शब्दात शहाजीबापू पाटील यांनी टीकास्त्र सोडलं.


आमदारकीपेक्षा मोठं काहीतरी घेऊन येतो, तुम्ही रुबाबात राहा- शहाजीबापू पाटील


पराभवाने खचू नका...माझ्यावर विश्वास ठेवा, या आमदारकी पेक्षा मोठे कायतर घेऊन येऊन दाखवतो, असे सांगत दोन महिन्यात यापेक्षा जास्त रुबाबात राहा असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. आता येणाऱ्या सगळ्या निवडणुकात गुलाल आपल्यालाच घ्यायचा असून यावेळी चुकीच्या पद्धतीने प्रचार केल्याने आपला पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले. 




संबंधित बातमी:


Eknath Shinde: ...म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून घ्यावी लागली माघार?; तो आकडा अन् सर्व 'गणित' बिघडले!