Maharashtra CM Eknath Shinde मुंबई: तुम्हाला आमच्यामुळे कुठेही अडचण येईल, असं आम्ही काहीही करणार नाही. कोणताही निर्णय घ्या...निर्णय घेताना माझी अडचण आहे, असं काही वाटून घेऊ नका, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सांगितल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. काल (27 नोव्हेंबर)ला पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. मात्र याचदरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून नेमकी माघार का घेतली, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
अन् शिंदे गटाचे सर्व गणित बिघडले?
लोकसत्ता या दैनिक वृत्तापत्राच्या वृत्तानूसार, भाजप वरिष्ठांनी तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडल्याने एकनाथ शिंदे यांना माघार घ्यायला लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 130 पेक्षा जागा मिळतील, असा कोणालाच अंदाज नव्हता. भाजपच्या नेत्यांना देखील इतक्या जागा मिळतील असं वाटलं नव्हतं. भाजपचा आकडा 132 पर्यंत पोहचला आणि शिंदे गटाचे सर्व गणित बिघडल्याचे बोलले जात आहे.
अमित शाह, नरेंद्र मोदींच्या निर्णयाला आमच्या पक्षाचा पाठिंबा- एकनाथ शिंदे
अमित शाह, नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इथे उभा आहे, एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले. कुठही घोडं अडलेलं नाही. मी कुठेही काही अडून धरलेलं नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही नाराज वगैरे नाही, आम्ही नाराज होणारे नाही लढणारे लोक आहोत. एवढा मोठा विजय मिळाला, आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय असा ऐताहासिक विजय असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
अमित शाह यांनी महाराष्ट्रातील समीकरणं समजून घेतली-
मराठा समाज आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आढावा घेतला. भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच 2014 ते 2024 पर्यंत मराठा समाजाची आंदोलन, कोर्टाचे निकाल, मराठा नेत्यांची भूमिकेचा आढावा घेतला. भवितव्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्वाचा आहे. याबाबत सर्व गणितांची मांडणी करण्यात आली. आगामी निवडणुका, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा, ओबीसीचा मतांबाबत चर्चा झाली. अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा या समीकरणावर चर्चा झाली. अमित शाह यांनी विनोद तावडेंकडून महाराष्ट्रातील मराठी समाजाची समीकरणं समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाची मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीजवजाबाकी करण्यात आली. मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची चिंता केंद्रीय नेतृत्वाला आहे.